
सलमान खानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या दोघांना गुजरातमधून अटक
मुंबई- अभिनेता सलमान खान याच्या घराबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणी मुंबई पोलिसांना मोठं यश मिळाले आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने गुजरातमधील भूज येथून सोमवारी रात्री उशिरा दोन्ही आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. विक्की गुप्ता (२४) आणि सागर पाल (२१) अशी आरोपींची नावे आहेत. सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करणारे आरोपी नवी मुंबईतील पनवेलमध्ये वास्तव्य करत होते. मागील एक महिन्यापासून त्यांनी पनवेलमध्ये भाड्यावर घर घेतले होते. या दोघांनी सलमान खानच्या घराची रेकी केली आणि त्यानंतर गोळीबार केला. दोन्ही आरोपींना सोमवारी रात्री उशिरा भूजमधून मुंबई पोलिसांनी अटक केली. दोन्ही आरोपी हे मूळचे बिहार राज्यातील पश्चिम चंपारण जिल्ह्यातील आहे. या दोन्ही आरोपींना मुंबईत आणले जाणार आहे. रविवारी (14 एप्रिल 2024) मुंबईत अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर दोन हल्लेखोरांनी गोळीबार केला होता. यानंतर दोघेही घटनास्थळावरून पळून गेले. पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली होती. मुंबई पोलिसांच्या हाती सीसीटीव्ही फूटेज लागले असून आरोपींचा चेहराही समोर आला. सलमान खानच्या घराजवळ गोळीबार केल्यानंतर हल्लेखोर सलमानच्या घरापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या माउंट मेरी चर्चजवळ मोटरसायकल सोडून निघून गेल्याचे तपासात आढळले. आरोपींनी त्या ठिकाणाहून रिक्षा करून वांद्रे रेल्वे स्थानक गाठले. आरोपी बोरिवलीच्या दिशेने जाणाऱ्या ट्रेनमध्ये चढले पण सांताक्रूझ रेल्वे स्टेशनवर उतरले आणि तेथून बाहेर पडले. त्यानंतर ते मुंबईतून पळून गुजरातच्या भूजमध्ये लपले. गोळीबार करून पळून गेलेले आरोपी हे गुजरातच्या भूज येथे लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत दोन्ही आरोपींना अटक केली आहे. *निवेदिता फास्ट न्यूज*