
मुंबई गोवा महामार्गावरील उन्हाळे येथील पिकअप शेडला अडथळा ठरणारा अनधिकृत खोका हटवला.
मुंबई गोवा महामार्गावरील उन्हाळे गंगातीर्थ फाट्यानजीक असलेल्या दुकान खोक्यामुळे पिकअप शेडचे काम रखडले होते. अखेर राज्याचे मत्स्य व बंदरविकास मंत्री व रत्नागिरी जिल्ह्याचे संपर्क मंत्री ना.नितेश राणे यांच्या सुचनेनुसार प्रशासनाने तत्काळ सदर खोका हटविला असून आता पिकअप शेडचे काम मार्गी लागणार असल्याने उन्हाळे ग्रामस्थांनी ना.राणे यांना धन्यवाद दिले आहेत.
‘राजापूर तालुक्यातील मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे बहुतांश काम पूर्ण झाले असले तरी महामार्गावर एसटी थांबे असलेल्या अनेक ठिकाणी पिकअप शेड नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत होती. दरम्यान आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून काही एसटी पिकअप शेड मंजूर झाल्या असून काही शेडची कामे देखील पूर्ण झाली आहेत. यामध्ये गंगातीर्थ फाटा येथील पिकअप शेडचाही समावेश होता. मात्र ज्या ठिकाणी पिकअप शेड बांधण्यात येणार आहे, त्या ठिकाणी दुकानगाळा उभारण्यात आल्याने पिकअप शेड उभारताना अडचण निर्माण झाली होती.
महामार्गावर पिकअप शेड नसल्याने उन्हाळे गावातील प्रवाशी तसेच शाळकरी विद्यार्थ्यांना उन-पावसात उभे रहावे लागत होते. याबाबत उन्हाळे गावातील महिलांनी राष्ट्रीय महामार्ग, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता यांची भेट घेत याबाबत निवेदन सादर केले होते. त्यानंतर काही दिवसांपूर्वी राज्याचे मत्स्य व बंदरविकास मंत्री व रत्नागिरी जिल्ह्याचे संपर्क मंत्री ना.नितेश राणे यांची भेट घेवूनही निवेदन सादर केले होते. त्यानंतर ना.राणे यांनी सदर दुकान खोका तत्काळ हटवून पिकअप शेडचे काम मार्गी लावण्याच्या सुचना प्रशासनाला दिल्या होत्या.त्यानुसार मंगळवारी प्रशासनाने पोलिस बंदोबस्तात सदर दुकान खोका हटविला