मठ येथील लक्ष्मीपल्लीनाथाचा १०८वा चैत्रोत्सव १८ एप्रिलपासून

लांजा : मठ (ता. लांजा) येथील श्रीदेव लक्ष्मीपल्लीनाथाचा १०८वा चैत्रोत्सव येत्या गुरुवारपासून (१८ एप्रिल २०२४) सुरू होत आहे. या वर्षीच्या चैत्रोत्सवाची संपूर्ण सेवा मुंबई येथील टिकेकर कुटुंबीय करणार आहेत.चैत्र शुद्ध दशमीपासून (१८ एप्रिल) पौर्णिमेपर्यंत म्हणजेच २३ एप्रिलपर्यंत धार्मिक, पारंपरिक आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी हा वार्षिक चैत्रोत्सव साजरा होणार आहे. दररोज पूजा, अभिषेक, कीर्तन, नामजप आणि यागादी कार्यक्रमांचा त्यात समावेश आहे. पहिल्या दिवशी १८ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता श्रींची चतुःषष्टी राजोपचार पूजा होईल. त्याच दिवशी रात्री १० वाजल्यापासून स्थानिक कलाकारांचे विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम होणार आहेत.शुक्रवार, १९ एप्रिल ते मंगळवार, २३ एप्रिलपर्यंत दररोज सकाळी ८ ते दुपारी अडीच वाजेपर्यंत पूजा, अभिषेक, आरती, मंत्रपुष्प आणि महाप्रसाद होईल. याच वेळेत १९ एप्रिलला नवचंडी, २० एप्रिलला दत्तयाग, २१ एप्रिलला सौरयाग, २२ एप्रिलला रुद्र स्वाहाकार, तर २३ एप्रिलला गणेशयाग होणार आहे.१९ एप्रिल ते २२ एप्रिलपर्यंत दररोज रात्री ९ वाजल्यानंतर नृसिंहवाडी येथील ह. भ. प. विवेकबुवा गोखले यांची कीर्तने होणार असून, २४ एप्रिलला पहाटे ४ वाजता ह. भ. प. विवेकबुवा गोखले यांचे लळिताचे कीर्तन होईल. दररोज सायंकाळी साडेसातनंतर आरत्या आणि नामजप, रात्री १२ वाजल्यानंतर भोवत्या आणि छबिन्याचा कार्यक्रम होईल.१९ एप्रिलला सायंकाळी पाच ते सात या वेळेत महालक्ष्मी कुंकुमार्चन आणि हळदी-कुंकवाचा कार्यक्रम होणार आहे. २३ एप्रिल रोजी सायंकाळी पाच ते सात या वेळेत संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा होणार आहे. २३ एप्रिललाच रात्री नऊ ते १२ या वेळेत इन्फिगो आय केअर हॉस्पिटल्सचे डॉ. श्रीधर ठाकूर ‘हसत खेळत आरोग्य’ हा कार्यक्रम सादर करणार आहेत.उत्सवकाळातील धार्मिक विधींसाठी श्रेयस मुळ्ये (9405917567, 9028745038) किंवा उमेश आंबर्डेकर (9423292437) यांच्याशी संपर्क साधावा. वार्षिक चैत्रोत्सवाला उपस्थित राहण्याचे आवाहन श्रीदेव लक्ष्मीपल्लीनाथ संस्थानाचे अध्यक्ष मंदार हळबे, उपाध्यक्ष श्रीनिवास गुण्ये, चिटणीस नंदकुमार नेवाळकर आणि खजिनदार श्रेयस मुळ्ये यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button