
यंदा भारतात सरासरीहून अधिक मान्सून राहण्याची शक्यता
यंदा भारतात सरासरीहून अधिक मान्सून राहण्याची शक्यता आहे, असे भारतीय हवामान विभागाने (IMD) सोमवारी जाहीर केले. जून ते सप्टेंबर महिन्यांमध्ये सामान्य पावसाच्या तुलनेत सरासरी १०६ टक्के पाऊस होण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने जाहीर केले. दुष्काळ, तापमानवाढ, गारपीट, पूर असे अनेक हवामान बदल घडत असताना देशात यंदा पाऊस कसा असणार याविषयी शेतकऱ्यांसह सामान्य नागरिकांना हवामान विभागाच्या अहवालाची प्रतीक्षा होती. सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता वर्तवण्यात आल्याने महाराष्ट्रात आशादायी परिस्थिती निर्माण झाली आहे. भारतात साधारणपणे १ जूनच्या सुमारास केरळच्या दक्षिणेकडील टोकावर मान्सूनला सुरुवात होते.