
केजरीवालांना दिलासा नाहीच; अटक प्रकरणी आता सुप्रीम कोर्टात २९ एप्रिलला सुनावणी
दिल्ली मद्य धोरण प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) केलेल्या अटकेला आव्हान देणाऱ्या दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या याचिकेवर आज (दि.१५ एप्रिल ) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती दीपंकर दत्ता यांच्या खंडपीठाने ‘ईडी’ला नाेटीस बजावली आहे. या प्रकरणी ‘ईडी’ला २४ एप्रिलपर्यंत उत्तर दाखल करावे, असा आदेश खंडपीठाने दिला आहे. तसेच या प्रकरणी पुढील सुनावणी २९ एप्रिल राेजी हाेईल, असेही स्पष्ट केले.दिल्ली मद्य धोरण प्रकरणी ईडीने केजरीवालांना २१ मार्च रोजी अटक केली होती. त्यांनी अटक बेकायदा असल्याचा दावा करणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केली होती. १० एप्रिल रोजी दिल्ली उच्च न्यायालयाने केजरीवाल यांची याचिका फेटाळली होती. या निकालाला आव्हान देणारी याचिका केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती.आजच्या सुनावणीत केजरीवाल यांच्या वतीने ज्येष्ठ वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी युक्तीवाद केला. लोकसभा निवडणुकीपूर्वी केजरीवाल यांना झालेल्या अटकेच्या कारवाईवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. यावर खंडपीठाने स्पष्ट केले की, या प्रकरणातील वस्तुस्थिती आम्हाला माहीत आहे. आम्ही कागदपत्रांचे वाचन केले आहे. आम्ही नोटीस बजावल्यानंतर तुम्ही युक्तिवाद करू नये,’ असे स्पष्ट करत न्यायालयाने या प्रकरणाची पुढील सुनावणी २९ एप्रिल रोजी होईल, असे न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती दीपंकर दत्ता यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले.www.konkantoday.com