
लोकसभा निवडणुकीसाठी रत्नागिरी निवडणूक कार्यालयाचे नवे दरपत्रक जाहीर,चिकन थाळी 160 रुपये, मटण थाळी 230 रुपये
लोकसभा निवडणूकीत उमेदवार आणि पक्षाकडून होणाऱ्या खर्चावर निवडणूक आयोग लक्ष ठेवून असतो. उमेदवाराच्या खर्चाचे मोजमाप होण्यासाठी तसेच वाढती महागाई लक्षात घेऊन रत्नागिरी निवडणूक कार्यालयाने नवे दरपत्रक जाहीर केले आहे.त्यामध्ये निवडणूक आयोगाचा वडापाव 15 रुपये, साधा चहा 10 रुपये तर स्पेशल चहा 15 रुपये, चिकन थाळी 160 तर मटण थाळी 230 रुपये आहे.लोकसभा निवडणूकीची रणधुमाळी सुरु आहे. उमेदवारी अर्ज भरण्यापुर्वीच रत्नागिरी निवडणूक अधिकारी कार्यालयाने आपले दरपत्रक जाहीर केले आहे. लोकसभा लढवणाऱ्या उमेदवाराला खर्चाची मर्यादा 95 लाख रुपये आहे. हा खर्च दाखवताना निवडणूक आयोगाच्या दरपत्रकाप्रमाणेच त्याला हिशोब द्यावा लागणार आहे. निवडणूकीच्या काळात लागणाऱ्या सर्व वस्तूंचे दरपत्रक निश्चित करण्यात आले आहे. त्यामध्ये वाहनांचे भाड्याचे दर 24 तासांसाठी निश्चित करण्यात आले आहेत. त्यामध्ये इंधनासह किंवा इंधनाविरहित अशा प्रकारचे दर निश्चित करण्यात आले आहेत. रिक्षापासून टॅम्पो, बोलेरो. इनोव्हा, मारुती व्हॅन, ट्रक आणि लक्झरीपर्यंतच्या वाहनापर्यंतचे दर निश्चित करण्यात आले आहेत. रिक्षाचे भाडे 24 तासासाठी 1,300 रुपये आहे तर इनोव्हाचे भाडे 24 तासांसाठी 4,800 रुपये आहे. लक्झरी बसचे भाडे 24 तासांसाठी 5 हजार रुपये ठेवण्यात आले आहे.रत्नागिरी निवडणूक अधिकाऱ्यांनी खाद्यपदार्थांचे दर निश्चित केले आहेत. शाकाहारी जेवणामध्ये साधी थाळी 100 रुपये, स्पेशल थाळी 130 रुपये, व्हेज पुलाव 60 रुपये, व्हेज बिर्याणी 65 रुपये, मांसाहारी थाळीमध्ये अंडाकरी थाळी 100 रुपये, चिकन थाळी 160 रुपये, मटण थाळी 230 रुपये, मच्छी थाळी 190 रुपये, अंडा बिर्याणी 120 रुपये, चिकन बिर्याणी 130 रुपये. नाश्त्यामध्ये पोहे आणि उपमा 25 रुपये, वडा आणि पॅटीस 15 रुपये, कोल्ड्रींक्स 20 रुपये दर निश्चित करण्यात आले आहेत. त्याचबरोबर झेंडे, स्पीकर, बिल्ले, मफलर, बॅनर, पोस्टर, व्हिडीओ कॅमेरा, एलईडी स्क्रीन, लॅपटॉप, जनरेटर, एअरकुलर, हॅलोजन, ड्रोन कॅमेरा, मंडप आणि स्टेजवर येणाऱ्या सर्व साहित्यापासून अगदी बॉलपेन आणि पेपरचेही दर निश्चित करण्यात आले आहेत. मेणबत्ती, कात्री, स्केचपेन, स्टीलपट्टीचे दरही दरपत्रकात नमूद करण्यात आले आहेत.www.konkantoday.com