नांदिवडे खुनातील संशयिताचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला
रत्नागिरी तालुक्यातील नांदिवडे भंडारवाडा येथील सुरेश पडवळ यांच्या खुनातील संशयिताचा जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळून लावला. मनराज दत्ताराम चव्हाण (५१, रा. दोन्ही नांदिवडे, भंडारवाडा) असे संशयित आरोपीचे नाव आहे. मृत सुरेश याची पत्नी शीतल व मनराज याच्यात अनैतिक संबंध असल्याचा संशय सुरेश याला होता. यातून वाद झाल्याने त्याची पत्नी शीतल व मनराज यांनी सुरेश याचा लाकडी बांबूने मारून खून केला, असा आरोप पोलिसांकडून ठेवण्यात आला आहे.पोलिसांनी केलेल्या अटकेनंतर मागील ६० दिवसांपासून मनराज हा जेलमध्ये आहे. आपण या प्रकरणात निर्दोष असून आपल्याला जामीन मिळावा, यासाठी मनराज याच्यावतीने सत्र न्यायालयापुढे जामिनासाठी अर्ज करण्यात आला होता. रत्नागिरी अतिरिक्त सत्र न्यायाधीश अनिलकुमार अंबाळकर यांच्या न्यायालयापुढे सुनावणी झाली. गुन्ह्यातील माहितीनुसार सुरेश धोंडू पडवळ (६४, रा. नांदिवडे भंडारवाडी) असे खून करण्यात आलेल्याचे नाव आहे. पत्नी शीतल हिने मनराज चव्हाण याच्याशी अनैतिक संबंध आहेत, यावरून सुरेश याचे पत्नी शीतल हिच्याशी वारंवार वाद होत होता. यातूनच २५ जानेवारी २०२४ रोजी शीतल हिने तिचा प्रियकर याच्या मदतीने खून केलल्याची बाब पोलिसांच्या तपासात समोर आली होती. या प्रकरणी पोलिसांनी मनराज चव्हाण व सुरेश यांची पत्नी शीतल पडवळ (५१) यांच्याविरूद्ध भादंवि कलम ३०२, १२० (बी) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच दोन्ही संशयितांना पोलिसांकडून अटक करण्यात आली. www.konkantoday.com