
आंबा कॅनिंगचा किलोचा दर आरंभीलाच ३० रुपये
फेब्रुवारीच्या मध्यात सुरू झालेला हापूस आंब्याचा हंगाम काही भागांमध्ये अंतिम टप्प्यात आला आहे. हे चित्र पावस परिसरात दिसून येत आहे. वाशीतील बाजार समितीमध्ये आवक वाढल्यामुळे दिवसेंदिवस हापूसच्या दराची घसरण सुरू झाली आहे. त्यामुळे कॅनिंगला आंबा देण्यास सुरवात झाली आहे. सध्या कॅनिंगचा किलोचा दर आरंभीलाच ३० रुपये मिळत आहे. हाच दर यापूर्वी ३२ ते ३५ रुपये मिळत होता. पावस परिसरामध्ये वानर-माकडे, बदलते हवामान व चोरट्यांचा वावर अशा प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत आंबा बागायतदार आपला व्यवसाय चांगल्या तर्हेने करत आहेत. यावर्षी हंगामाची सुरवात फेब्रुवारीमध्ये झाली. मार्चमध्येही कोकणातून बाजारात जाणाऱ्या पेट्यांची संख्या अधिक होती. सुरवातीला चांगला दर मिळत होता; मात्र आता आंब्याची आवक वाढल्यामुळे दर काही प्रमाणात घसरू लागला आहे. उन्हामुळे आंबा लवकर काढणीयोग्य होत असल्याने काही बागायतदार पूर्ण तयार झालेला आंबा बाजारात पाठवत आहेत. परिणामी, दलालांकडून दर कमी दिला जात आहे. सुरवातीच्या टप्प्यात आलेल्या मोहोरामधून चांगले उत्पादन आले होते. त्याला बाजारात चांगला दर मिळाला. येत्या आठ दिवसात हा बहर संपेल. त्यानंतर आलेल्या मोहोरातील उत्पादन हाती येण्यासाठी बागायतदारांना थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे.www.konkantoday.com