
सावंतवाडी-दोडामार्ग ‘पर्यावरणीयदृष्टीने संवेदनशील भाग’ असल्याची अधिसूचना काढण्यासाठी ११ वर्षांचा विलंब करण्यात आला, हे दुर्दैव-उच्च न्यायालय
सावंतवाडी-दोडामार्ग पर्यावरणीयदृष्टीने किती महत्त्वाचा आहे, याचे वैज्ञानिक पुरावे असून हा भाग महत्त्वाचा आहे, यावर राज्य सरकार आणि केंद्र सरकारचे एकमत असले तरी सावंतवाडी-दोडामार्ग ‘पर्यावरणीयदृष्टीने संवेदनशील भाग’ असल्याची अधिसूचना काढण्यासाठी ११ वर्षांचा विलंब करण्यात आला, हे दुर्दैव आहे.त्यामुळे आणखी विलंब न करता राज्य सरकारने हा भाग पर्यावरणीयदृष्टीने संवेदनशील असल्याचे जाहीर करण्यासाठी चार महिन्यांत केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवावा आणि केंद्र सरकारने सहा महिन्यांत अंतिम अधिसूचना काढावी, असे आदेश उच्च न्यायालयाने दिले.सावंतवाडी-दोडामार्ग कॉरिडॉरदरम्यान २५ गावे येतात. या मार्गिकेतून अनेक वन्यप्राणी ये-जा करत असल्याचे आढळले आहे. याठिकाणी मोठ्या प्रमाणावर जैवविविधता आहे. तसेच वनस्पतींच्या अनेक दुर्मीळ प्रजाती आहेत. हा भाग पर्यावरणीयदृष्टीने अत्यंत संवेदनशील असूनही येथे दोन वर्षांत ६३९.६२ हेक्टर जमिनीवर जंगलतोड करण्यात आली. ही चिंतेची बाब आहे. अशाच प्रकारे जंगलतोड होत राहिली आणि माणसांचा वावर वाढत गेला तर, हा कॉरिडॉर नष्ट होईल, असे निरीक्षण न्या. नितीन जामदार व न्या. एम. एम. साठ्ये यांच्या खंडपीठाने नोंदविले. या भागातील जंगलतोडीवर न्यायालयाने २०१३ मध्ये स्थगिती दिली होती. केंद्र सरकार अंतिम अधिसूचना काढेपर्यंत ही स्थगिती कायम राहील, असे न्यायालयाने स्पष्ट केले.www.konkantoday.com