
लोटेतील उद्योगांचे विस्कळीत उत्पादन हळुहळू पूर्वपदावर
खेड तालुक्यातील कोतवली येथे फुटलेल्या सीईटीपीच्या पाईपलाईनच्या दुरूस्तीचे काम गुरूवारी चौथ्या दिवशी पूर्णत्वाकडे गेले आहे. एमआयडीसीकडून काही किरकोळ कामे अजूनही शिल्लक असली तरी लोटेतील उद्योगांचे सांडपाणी अधूनमधून घेण्यास सुरूवात केली असल्याने उत्पादन हळुहळू पूर्वपदावर येवू लागले आहे.लोटे औद्योगिक वसाहतीतील उद्योगांचे रासायनिक सांडपाणी सीईटीपीमध्ये येवून त्यावर प्रक्रिया केल्यानंतर ते सांडपाणी एमआयडीसीच्या एच.डी.पी.ई. पाईपलाईनमधून करंबवणे खाडीत सोडले जाते. त्यासाठी टाकण्यात आलेल्या साडेसात कि.मी.ची पाईपलाईनच्या पॅच क्लँपमधून रविवारी सायंकाळी कोतवली येथे गळती सुरू झाली. त्यानंतर एमआयडीसीने पाईपलाईन दुरूस्तीचे काम हाती घेतल्यानंतर गुरूवारी चौथ्या दिवशी बहुतांशी काम पूर्णत्वास गेलेले असले तरी काही किरकोळ कामे अजूनही शिल्लक आहेत. www.konkantoday.com