
बाळासाहेबांचे वंशज म्हणजे शिवसेना नव्हे, तर त्यांचे विचार म्हणजे शिवसेना : आमदार योगेश कदम
रत्नागिरी : बाळासाहेबांचे विचार म्हणजे शिवसेना आहे तर बाळासाहेबांचे वंशज म्हणजे शिवसेना नाही, अशा शब्दात आमदार योगेश कदम यांनी ठाकरे सैनिकांना ठणकावले. ते म्हणाले, उध्दव ठाकरे यांच्यावर नाराजी म्हणजे शिवसेनेवर नाराजी असे मी मानत नाही. आमच्या रक्तात बाळासाहेब ठाकरे यांचे विचार रुजलेले आहेत. ते कालही होते, आजही आहेत आणि उद्याही राहतील. त्यांचे विचार सोडण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे त्यांनी रत्नागिरीत पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. खेड येथील मेळाव्यात केलेल्या वक्तव्याविरोधात रामदास भाईंचे पोस्टर जाळून रत्नागिरीत उध्दव ठाकरे गटातील सैनिकांनी निषेध केला. रत्नागिरी दौर्यावर असलेल्या आमदार कदम यांनी याचा समाचार घेतला आहे. ते म्हणाले, बाळासाहेबांचा मी चिरंजीव आहे, हे वाक्य उध्दव ठाकरे यांना वारंवार का सांगावे लागत आहे, असा प्रश्न रामदास भाईंनी भाषणात उपस्थित केला आहे. त्यांच्यावर कोणतीही टीका केलेली नाही. त्यांच्या वाक्याचा विपर्यास केला जात असून राज्यातील सध्याचे राजकारण पाहून भाईंच्या विरोधात शिवसैनिकांना भडकवले जात आहे. परंतु भाईंनी राज्यात शिवसेना वाढविण्यासाठी गेली बावन्न वर्षे प्रयत्न केला आहे. ते कुणीही विसरलेले नाहीत. बाळासाहेबांबाबत कोणताही वाईट विचार त्यांच्या स्वप्नातही येऊ शकत नाही. फक्त चुकीचा अर्थ लावून बदनाम करण्याचा प्रयत्न काही लोकं करत आहेत. आमच्यावर पन्नास खोके, बोके आणि ओके असे आरोप केले जात आहेत. हे फक्त शिवसैनिकांना भडकवण्यासाठी आहे. परंतु कुणीही पुरावे सादर करत नाही. एवढेच होते तर राष्ट्रवादीकडून अन्याय केला जात असताना सर्वजण का गप्प होते? खेडमधील मनसेच्या नगराध्यक्षांवर नियमाप्रमाणे कारवाई करण्यासाठी शरद पवार यांच्याकडून उध्दव ठाकरे यांना फोन जातो आणि ती कारवाई होत नाही. याच पध्दतीने दापोली मतदारसंघात आमच्यावर अन्याय झाला. त्यावर कोण काही बोलणार आहे का? असेही आ. कदम म्हणाले.