
कोंडमळ्यात पाण्यासाठी नागरिकांना करावी लागतेय दोन कि.मी. पायपीट
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर वसलेल्या आणि सावर्डेला लागून असलेल्या कोंडमळा गावाला सध्या भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. गावातील बहुतांशी विहिरी आटल्या असून गावच्या एका टोकाला असलेल्या एका विहिरीतून पाण्यासाठी तब्बल २ कि.मी.ची पायपीट करावी लागत आहे. पाणी योजनेच्या विहिरीचे पाणीही गेल्या नोव्हेंबरमध्ये आटल्याने गेल्या चार महिन्यांंपासून गावाची पाणीयोजनाही बंद पडलेली आहे.सुमारे २ हजार ९०० लोकसंख्येच्या कोंडमळा गावात नारळीची वाडी, निवाची वाडी, गंगेची वाडी, राडेवाडी, मधलीवाडी, टप्पेवाडी, सावंतवाडी, कातळवाडी, पेंढरेवाडी, शिर्केवाडी, धनगरवाडी असा एकूण अकरा वाड्या आहेत. महामार्गामुळे दोन भागात विभागलेल्या या मोठ्या गावात पाण्याची समस्या दरवर्षीच भेडसावत असते. पाणी योजना असूनही पाऊस गेल्यानंतर दोन तीन महिन्यातच विहिरीचे पाणी आटल्यानंतर बंद पडते. त्यामुळे या गावातील ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. www.konkantoday.com