इलेक्ट्रॉनिक, समाज माध्यमांवरील जाहिरातींसाठी प्रमाणिकरण बंधनकारक ही आहेत आवश्यक कागदपत्रे रत्नागिरी, दि. 13 (जिमाका) : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार इलेक्ट्रॉनिक तसेच समाज माध्यमांवरील जाहिरातींसाठी माध्यम प्रमाणिकरण व संनियंत्रण समितीकडून प्रमाणिकरण करुन घेणे उमेदवारांना बंधनकारक आहे. त्यासाठी आवश्यक कागदपत्रे पुढीलप्रमाणे आहेत.
भारत निवडणूक आयोगाने घोषित केलेला ॲनेक्चर २७ हा उमेदवार अथवा उमेदवारांने प्राधिकृत केलेल्या प्रतिनिधीचा अर्ज (अर्जावर स्वत: उमेदवाराची सही अथवा प्रतिनिधीची सही असल्यास त्याबाबत उमेदवाराचे प्रतिनिधी नियुक्त केलेले घोषणापत्र अर्जासोबत हवे), उमेदवाराच्या समाज माध्यम खात्याचा तपशील (उदा. फेसबुक, व्टिटर, इन्स्टाग्राम, यु टयुब), जाहिरात मजकुराची सोबत दोन प्रतीत संहिता, ऑडीओ, व्हीडीओ तसेच स्थिर जाहिरातीचा पेन ड्राईव्हमध्ये मजकूर, जाहिरात तयार करण्यासाठी आलेला खर्च व त्याचे देयक, प्रसारण कोठे करावयाचे आहे त्याबाबतच्या संभाव्य खर्चाचा तपशील आवश्यक आहे. मतदान पूर्व दिवशी तसेच मतदानादिवशी केवळ वर्तमान पत्रात करावयाच्या जाहिरातीचा मजकूर प्रसिध्दीच्या दोन दिवस आधी प्रमाणिकरण करुन घेणे बंधनकारक आहे. उमेदवारांनी अथवा त्यांच्या प्रतिनिधींनी जाहिरातींच्या प्रमाणिकरणासाठी जिल्हा माहिती कार्यालयातील माध्यम कक्ष, नवीन प्रशासकीय इमारत, ए विंग, तळमजला येथे कार्यालयीन वेळेत अर्ज सादर करावेत.