
अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाचा सुवर्ण महोत्सवी वर्षाचा भव्य शुभारंभ
रत्नागिरी : रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त उद्घाटन समारंभ महाविद्यालयाच्या डॉ. ज. शं. केळकर सेमिनार हॉल येथे उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते मा. प्रा. दिलीप बेतकेकर होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कार्याध्यक्षा सौ. शिल्पा पटवर्धन होत्या. यावेळी संस्थेचे सहसचिव प्रा. श्रीकांत दुदगीकर, नियामक मंडळाचे सदस्य तथा महाविद्यालयाच्या प्रथम बॅचचे विद्यार्थी डॉ. संजय केतकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, उपप्राचार्य सुनील गोसावी, पर्यवेक्षक विद्याधर केळकर, तसेच शिक्षकवर्ग आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात महाविद्यालय गीताने झाली. चित्रफितीद्वारे माजी इंग्रजी शिक्षिका सौ.मीनाक्षी केळकर यांनी मनोगत व्यक्त करत महाविद्यालयाच्या “एका छोट्याशा रोपट्यापासून ते विशाल वृक्षापर्यंतच्या प्रवासाची” सुंदर मांडणी केली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.
प्रास्ताविकात बोलताना उपप्राचार्य श्री. गोसावी यांनी बाबुराव जोशी आणि मालतीबाई जोशी यांच्या योगदानाचा गौरव करत, माजी व आजी प्राचार्य, उपप्राचार्य, शिक्षक आणि उज्वल यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
आपल्या मनोगतात प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर म्हणाले, “ही ५० वर्षे म्हणजे फक्त कालमापन नव्हे, तर शिक्षण, संस्कार आणि समाजसेवेचे सुवर्णपर्व आहे. संवेदनशील आणि जागृत विद्यार्थी घडवणे ही आपली मोठी जबाबदारी आहे.”
प्रमुख वक्ते प्रा. दिलीप बेतकेकर यांनी “कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षणासाठी आगामी १० वर्षांची दिशा” या विषयावर भाषण करताना म्हटले की, “तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) यांची सांगड भारताच्या सांस्कृतिक वारशाशी घालणे आवश्यक आहे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या अंत:करणाला स्पर्श करावा आणि त्यांना बेसिक स्किल्ससोबतच स्वावलंबी बनवावे.”
सहसचिव श्री. दुदगीकर यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “विद्यार्थ्यांना फक्त माहिती नको, तर ज्ञान हवे आहे.” तसेच महाविद्यालयाने पार केलेल्या विविध माईलस्टोन्सचा आढावा घेत त्यांनी विद्यार्थ्यांच्या मानसिक स्वास्थ्याचे महत्त्व अधोरेखित केले.
कार्याध्यक्षा सौ. शिल्पा पटवर्धन यांनी शिक्षकांना संदेश देताना सांगितले, “शिक्षकांनी सतत आत्मचिंतन करावे. कोणतेही कार्य हातात घेतल्यावर ते पूर्ण केल्याशिवाय थांबू नये, हा संदेश माझ्या वडिलांकडून मला लाभलेला आहे.” त्यांनी सर्वांना सुवर्ण महोत्सवाच्या शुभेच्छा देत म्हटले की, “मुलांचे भविष्य घडविण्याची जबाबदारी आपल्यावर आहे.”
कार्यक्रमात प्रा. माधवी लेले यांच्या सुरेल गीताने उपस्थितांना स्फूर्ती दिली.
कार्यक्रमाचे वक्ते परिचय प्रा. निनाद तेंडुलकर यांनी करून दिला. सूत्रसंचालन प्रा. प्रभात कोकजे यांनी केले, तर आभार प्रदर्शन महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा. विद्याधर केळकर यांनी केले.




