लोकसभेसाठी जिल्हा प्रशासन सज्ज; आजपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात
रत्नागिरी :- लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील रणसंग्राम आज शुक्रवार (दि. १२ एप्रिल) पासून सुरू होत आहे. उमेदवारांचे अर्ज आजपासून दाखल होणार असून, सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत ते स्वीकारण्यात येणार आहेत. अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेदरम्यानही उमेदवारांना अनेक बंधने आहेत. त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात कडेकोट व्यवस्था ठेवण्यात आली आहे. निवडणूक कालावधीत निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात उमेदवारांनी अर्ज दाखल करताना वाहनांच्या ताफ्यामध्ये तीनपेक्षा जास्त वाहने यांचा ताफ्यात समावेश नसावा. तसेच अर्ज दाखल करताना निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या दालनात पाच व्यक्तींव्यतिरिक्त कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही, असा आदेश निवडणूक निर्णय अधिकारी सिंह यांनी १७ मार्च २०२४ रोजीच काढला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करताना कार्यालयाच्या परिसरात मिरवणूक अथवा सभा घेणे, कोणत्याही प्रकारच्या घोषणा देणे, वाद्य वाजविणे किंवा गाणी म्हणणे तसेच निवडणूक प्रचार करण्यावर प्रतिबंध करण्यात आला आहे.लोकसभा निवडणुकीसाठी दि. १२ ते १९ एप्रिल या कालावधीत अर्ज भरता येणार आहे. त्यामुळे आचारसंहितेचे पालन करण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नव्याने सुरू करण्यात आलेल्या प्रवेशद्वारासमोरच गुरुवारी बुथ तयार करण्यात आला आहे. या ठिकाणी पोलिस दल तैनात ठेवण्यात आले आहे. येणाऱ्या उमेदवारांच्या केवळ तीन वाहनांना आत प्रवेश दिला जाणार आहे. त्यादृष्टीने या परिसरात नियोजित मार्ग ठेवण्यात आला आहे. अर्ज भरण्याच्या कालावधीत कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरील सर्व टपऱ्या तसेच फळविक्रेत्यांच्या गाड्याही गुरुवारी हटविण्यात आल्या आहेत. त्यामुळे हा परिसर आता मोकळा झाला आहे. रत्नागिरी निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह तसेच जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व सज्जता ठेवण्यात आली आहे.