रा. प. महामंडळातील (एसटी) वाहकांच्या अपहारप्रकरणी बदली धोरणाबाबत असलेले जाचक परिपत्रक रद्द करण्यात मान्यताप्राप्त महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेला अखेर यश
रा. प. महामंडळातील (एसटी) वाहकांच्या अपहारप्रकरणी बदली धोरणाबाबत असलेले जाचक परिपत्रक रद्द करण्यात मान्यताप्राप्त महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेला अखेर यश आले.त्यासाठी संघटना गेली ७ वर्षे सातत्याने मागणी करत होती. आंदोलन केल्यामुळे याला यश आले असून शेकडो वाहकांना न्याय मिळणार आहे, अशी माहिती संघटनेचे राज्य अध्यक्ष संदीप शिंदे यांनी दिली.याबाबत शिंदे यांनी सांगितले की, २/२०१७ हे परिपत्रक काढल्यापासूनच वाहकांमध्ये असंतोष पसरलेला होता. विनामूल्य विनातिकीट तीन केसेस झाल्यानंतर त्या वाहकाची बदली प्रथम विभागाच्या बाहेर करण्यात येत होती; परंतु कामगार संघटनेने विरोध दर्शवल्यानंतर विभागांतर्गत बदली करण्यास सुरवात झाली. संघटनेने हे परिपत्रक रद्दच करण्यात यावे, या भूमिकेतून आपल्या प्रत्येक आंदोलनात मुद्दा रेटून धरला होता. या संदर्भात संघटना न्यायालयात देखील गेली होती. न्यायालयाने एका गुन्ह्यात दोन शिक्षा देता येत नाहीत, अशा प्रकारे सुनावणी केली होती. तरीदेखील प्रशासन हे परिपत्रक रद्द करण्यास तयार नव्हते. अखेर ४ एप्रिलला रा. प. महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक माधव कुसेकर यांच्या समवेत महाराष्ट्र एसटी कामगार संघटना पदाधिकाऱ्यांच्या झालेल्या बैठकीत संघटनेने या प्रकरणी हे परिपत्रक रद्द करण्याचा विषय अतिशय व्यापक व आक्रमक पद्धतीने मांडला. त्यानंतर कुसेकर यांनी मिनिट्समध्ये लिहून दिले की, हे परिपत्रक लवकरच रद्द करण्यात येईल आणि त्याप्रमाणे हे परिपत्रक रद्द करण्यात संघटनेला यश आले.Wwwkonkantoday.com