
एक टक्काभर जरी आघाडी कमी मिळाली तरी निधी मिळणार नाही-नितेश राणे
रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी कंबर कसली आहे. तसेच येथील उमेदवाराची अद्याप अधिकृत घोषणा झाली नसली तरी राणेंनी प्रचारालाही सुरुवात केली आहे.दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या नियोजनाबाबत मार्गदर्शन करताना नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे यांनी कार्यकर्त्यांना सूचनावजा इशारा दिला आहे. एक टक्काभर जरी आघाडी कमी मिळाली तरी निधी मिळणार नाही, असे नितेश राणे यांनी म्हटले आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान, भाजपाच्या एका कार्यक्रमात कार्यकर्त्यांना संबोधित करताना नितेश राणे म्हणाले की, मी सर्व सरपंच सहकाऱ्यांना सांगेन की, आपापल्या निवडणुकीप्रमाणे आपल्याला यंत्रणा लावायची आहे. तुम्हाला निवडणुकांमध्ये जेवढं मतदान झालं आहे. त्यापेक्षा जास्तच मतदान या निवडणुकीमध्ये मिळालं पाहिजे. एक टक्काही कमी मतदान चालणार नाही. ४ जून रोजी सगळ्यांचा हिशोबच घेऊन बसणार आहे, असा इशाराच नितेश राणे यांनी दिला.नितेश राणे पुढे म्हणाले की, ४ जून रोजी मला हवी तशी आघाडी मिळाली नाही, तर नंतर हवा असलेला निधी वेळेत मिळाला नाही तर तक्रार करायची नाही. हेही आज मी सांगतो. हे मी तुमच्याकडे हक्काने मागत आहे, कारण तुम्ही आमच्या आमदार, मंत्री इतर कुणाकडेही आलात तर तुम्हाला कधी रिकाम्या हाती पाठवलेलं नाही. त्यामुळे आज जेव्हा आम्ही तुमच्यासमोर मागायला उभे आहोत. तेव्हा मला नारायण राणे यांचा विजय हा पाहिजे म्हणजे पाहिजेच, असेही नितेश राणे यांनी सांगितले.www.konkantoday.com




