कोकणात भाजप आणि शिवसेनेमध्ये राजकीय धुमशान,भाजपच्या नेत्याने शिवसेना नेते रामदास कदम आणि त्यांचे पूत्र योगेश कदम यांच्यावर निशाणा साधला
कोकणात भाजप आणि शिवसेनेमध्ये राजकीय धुमशान पाहायला मिळत आहे. महायुतीमध्ये सहभागी असूनही भाजपच्या नेत्याने शिवसेना नेते रामदास कदम आणि त्यांचे पूत्र योगेश कदम यांच्यावर निशाणा साधला आहे.खेडचं पार्सल बोरिवलीमध्ये पाठवायला वेळ लागणार नाही, असा इशारा माजी आमदार सूर्यकांत दळवी यांनी दिला आहे, यामुळे कोकणात महायुतीत संघर्ष पेटण्याची चिन्ह आहेत.दापोलीमध्ये पार पडलेल्या भाजप कार्यकर्ता मेळाव्यात भाजपच्या नेत्यांनी शिवसेना नेते रामदास कदम यांच्यावर टीका केली. गेले काही दिवस सातत्याने भाजपविरोधात बोलणाऱ्या आणि भाजपवर आरोप करणाऱ्या शिवसेना नेते रामदास कदम यांना भाजपने इशारा दिला आहे.भाजपला डिवचायचा प्रयत्न केला तर आम्ही दापोलीवाले आहोत, विधानसभेच्या निवडणुकादेखील काही महिन्यांवर आहेत. याद राखा, हे खेडचं पार्सल बोरिवलीमध्ये पाठवायला वेळ लागणार नाही, असा इशारा भाजप नेते सूर्यकांत दळवी यांनी रामदास कदम आणि आमदार योगेश कदम यांना दिला आहे.सूर्यकांत दळवी यांनी या सभेतून शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते अनंत गिते यांनाही लक्ष्य केलं आहे. मला महाविकासआघाडी मान्य नाही, वेळ पडल्यास मी अपक्ष लढवेन किंवा भाजपकडून लोकसभा निवडणू लढवेन, असं अनंत गिते म्हणाले होते, त्यांना आता त्याचा विसर पडलाय, असा टोला सूर्यकांत दळवी यांनी लगावला. अनंत गिते दरवेळी निवडणुकीत कुणबी समाजाला भावनिक आवाहन करतात, किती दिवस हे चालणार आहे? मतदारांची तुम्ही किती दिवस फसवणूक करणार आहात? अशी टीका सूर्यकांत दळवींनी अनंत गिते यांच्यावर केली.www.konkantoday.com