
मनसेचे सरचिटणीस कीर्ती कुमार शिंदे यांचा परखड पोस्ट शेअर करत मनसेला जय महाराष्ट्र
निवडणुकीच्या तोंडावर राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. अशातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा देत असल्याचं काल(मंगळवारी) जाहीर केलं.त्यांच्या या भूमिकेमुळे सर्वांनाच धक्का बसला आहे, गेल्या काही दिवसांमध्ये मनसे महायुतीसोबत जाणार असल्याच्या आणि काही जागांवर लोकसभा निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या होत्या. अशातच त्यांनी काल मनसेच्या मेळाव्यात आपण महायुतीला पाठिंबा देत असल्याचे जाहीर केले. त्यानंतर पक्षातील नेत्यांमध्ये नाराजी दिसून येत आहे. राज ठाकरेंनी आपली भूमिका मांडल्यानंतर मनसेचे सरचिटणीस कीर्ती कुमार शिंदे यांनी परखड पोस्ट शेअर करत मनसेला जय महाराष्ट्र केला आहे.पोस्टमध्ये कीर्ती कुमार शिंदे यांनी राज ठाकरेंच्या आधीच्या आणि आताच्या भूमिकेवर सवाल उपस्थित केला आहे. ‘आज ५ वर्षांनी देशाच्या इतिहासातील अत्यंत निर्णायक क्षणी राजसाहेबांनी त्यांची राजकीय भूमिका बदलली आहे. ती किती चूक, किती बरोबर, हे राजकीय विश्लेषक सांगतीलच. सध्याच्या काळात राजकीय नेते त्यांना हवे तेव्हा त्यांना हवी ती राजकीय भूमिका घेऊ शकतात. पण त्यांच्या विचारांवर विश्वास ठेवून लढणाऱ्यांची कुचंबणा होते. त्याचं काय?’, असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.त्याचबरोबर त्यांनी भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्यावर हल्लाबोल केला आहे. गेल्या दहा वर्षांमध्ये भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह यांनी देशाचं वाटोळं केलं आहे, असा टोला देखील कीर्ती कुमार शिंदे यांनी लगावला आहे.त्याचबरोबर ‘राजसाहेब ठाकरे यांनी ‘भामोशा’ची बाजू घेणं हे त्यांच्या स्वतःसाठी गरजेचं असू शकतं, पण त्यातून महाराष्ट्राचा- मराठी माणसाचा कोणताही लाभ होण्याची सुतराम शक्यता नाही. त्यांची ही भूमिका सत्तेच्या राजकारणात, मनसेचे आणि स्वत:चे अस्तित्व टिकवण्यासाठी योग्य असू शकेल, पण त्यांनी घेतलेली बाजू सत्याची नाही’, असं म्हणत त्यांनी आपली परखड भूमिका मांडली आहे.www.konkantoday.com