
स्टार प्रचारक म्हणून रत्नागिरीच्या तोफा राज्यभर धडाडणार
राज्यातील बहुतांशी मतदासंघातील उमेदवारांची त्या-त्या राजकीय पक्षांनी घोषणा केली आहे. उमेदवारांच्या घोषणेबरोबरच महत्त्वाच्या राजकीय पक्षांकडून स्टार प्रचारकांची नावेही अंतिम करण्यात आली आहे. यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील नेत्यांचा आणि त्या-त्या राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचा स्टार प्रचारक म्हणून समावेश केला आहे. त्यामुळे या निवडणुकीत रत्नागिरीच्या तोफा राज्यभर धडाडणार आहेत.शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव स्टार प्रचारक आहेत. त्यांच्याकडे सध्या पूर्व विदर्भाची जबाबदारी देण्यात आली आहे. ते या भागातील शिवसेना आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार करत आहेत. पूर्व विदर्भात शिवसेनेची एकही जागा नाही. मात्र यावेळी पूर्व विदर्भातून शिवसेनेचे खाते उघडण्याचा विडा भास्कर जाधव यांनी उचलला आहे. शिंदे गटातील हेवीवेट मंत्री उदय सामंत हे महायुतीतील स्टार प्रचारक आहेत. तेही महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी राज्यभर फिरत आहेत. शिवसेना नेते रामदास कदम मुंबईसह कोकणात महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करताना दिसणार आहेत.www.konkantoday.com