खासदार विनायक राऊतांच्या प्रचारासाठी येणाऱ्या उद्धव ठाकरे यांना जिल्हा, तालुका नव्हे तर दारातसुद्धा उभे करू नका-नारायण राणे
दिल्लीतील रामलीला मैदानावर जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींना तडीपार करण्याची भाषा करणाऱ्या उद्धव ठाकरे यांची राज्यातली अवस्था काय आहे? त्यांचे खासदार किती? आमदार किती आहेत?व जे आहेत ते सुद्धा जाणार आहेत. त्यामुळे आता यांनाच तडीपार करण्याची वेळ आली आहे. कोरोनाच्या काळात स्वतः मुख्यमंत्री असताना औषधे, इंजेक्शनच्या खरेदीतून करोडोंचा भ्रष्टाचार करणाऱ्या उद्धव ठाकरेंना त्यांच्या पुत्रासह नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या नव्या इनिंगमध्ये तडीपारच व्हावे लागणार आहे. आता खासदार विनायक राऊतांच्या प्रचारासाठी येणाऱ्या उद्धव ठाकरे यांना जिल्हा, तालुका नव्हे तर दारातसुद्धा उभे करू नका असा घणाघात भाजपा नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केला. रत्नागिरी येथे झालेल्या भाजपाच्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते.नारायण राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत रत्नागिरी शहरात शहर, तालुका पदाधिकाऱ्यांचा कार्यकर्ता संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी माजी खासदार निलेश राणे, लोकसभा प्रभारी माजी आमदार बाळ माने, जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, जिल्हा उपाध्यक्ष दत्ता देसाई, भाजपचे ज्येष्ठ नेते अॅड. बाबा परुळेकर, महिला जिल्हाध्यक्ष सुजाता साळवी, माजी नगराध्यक्ष अशोक मयेकर, महेंद्र मयेकर, जिल्हा सरचिटणीस सतेज नलावडे, तालुकाध्यक्ष विवेक सुर्वे, दादा दळी, लीलाधर भडकमकर, सचिन वाहळकर, भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष ऋषिकेश केळकर, महिला शहराध्यक्ष पल्लवी पाटील, प्रशांत डिंगणकर, मंदार मयेकर, राजन फाळके यांच्यासह भाजपचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.देशात, राज्यात आपली सत्ता आहे. मोदींचे नेतृत्व जगमान्य आहे. सन २०१४ मध्ये अर्थव्यवस्थेत जगात ११ व्या क्रमांकावर असलेला भारत देश नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात दहा वर्षात पाचव्या क्रमांकावर पोहचला आहे व लवकरच तो तिसऱ्या क्रमांकावर पोहोचणार आहे. ६५ वर्षात जे काँग्रेससह राहुल गांधींना जमले नाही ते मोदींनी करुन दाखविले आहे. काँग्रेसने ४५ पानांचा जाहीरनामा काढला आहे, पण नरेंद्र मोदी व अमित शाह यांच्या विकास यात्रेसमोर कोणाचाही टिकाव लागू शकणार नाही हे त्यांनी लक्षात ठेवावे. त्यामुळे विरोधी पक्षनेता होण्याएवढे संख्याबळही त्यांच्याकडे नाही. त्यांच्यासोबत उद्धव ठाकरे रामलीला मैदानावर गेले, तिथे मोदींना हद्दपार केले पाहिजे असे भाषण ठोकून आले. पण मोदींवर टीका करण्यापूर्वी स्वतः उद्धव ठाकरे यांनी विकासात्मक कोणते काम केले ते सांगितले पाहिजे. ठाकरेंमुळे किती कारखाने, किती उद्योग आले, किती प्रमाणात रोजगार निर्माण झाला हे त्यांनी दाखवले पाहिजे. जेव्हा कोरोना काळात लोकांकडे खायला अन्न नव्हते त्यावेळी पंतप्रधानांनी देशातील ८० कोटी लोकांना मोफत अन्न दिले. आरोग्य सुधारण्यासाठी आयुष्यमान योजना सुरु केली. त्यावेळी मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे फक्त दोन दिवस मंत्रालयात गेले व उरलेला कारभार मातोश्रीवरून चालवला. कोरोना काळात रुग्णांच्या इंजेक्शन, औषध खरेदीमध्ये भ्रष्टाचार केला. ते आज राहुल गांधी, केजरीवाल यांच्या बाजुला उभे राहून मोदींवर टीका करत आहेत पण आता त्यांना जिल्हा, तालुकाच नव्हे तर दारासमोरपण उभे करू नका असे सांगितले.www.konkantoday.com