आसमंत बेनवोलन्स फाउंडेशनच्या उद्यानात प्राणी, पक्ष्यांची संख्या वाढली
ओसाड रानमाळावर वनस्पतींची लागवड करून जैवविविधता संवर्धन करणाऱ्या आसमंत बेनवोलन्स फाउंडेशनच्या उद्यानात प्राणी, पक्ष्यांची संख्या वाढली आहे. येथे देशी झाडे सुरेख वाढली आहेत. गेल्या सात वर्षात पक्ष्यांच्या संख्येत मोठी वाढ दिसून येत आहे. फुलपाखरं, छोटे कीडे आणि सरपटणारे प्राणी यांच्या संख्येत वाढ झाली आहे. मातीचा पोत बदललेला दिसतो आहे. सध्या कडक उन्हाळ्यामुळे या झाडांना पाणीपुरवठा केला जात आहे. येथे बांधलेल्या कृत्रिम तलावातील पाणीसुद्धा कमी झाले आहे. त्यामुळे पाण्यासाठी थोडे कष्ट घ्यावे लागत आहेत.या उद्यानात ५००च्या आसपास देशी वनस्पती, ५५ प्रकारचे पक्षी, २० प्रकारची फुलपाखरं, असंख्य छोटे जीव, कीटक आणि सरपटणारे प्राणी आहेत. २०१२ पासून आसमंत फाउंडेशन काम करत आहे. संस्थापक नंदकुमार पटवर्धन यांनी जैवविविधता तज्ज्ञांकडून माहिती घेऊन एमआयडीसी परिसरात सुमारे साडेसहा एकर परिसरात २०१६ पासून उद्यान उभे केले. या उद्यानाकरिता भरपूर वेळ द्यावा लागतो.सध्या आसमंतच्या जैवविविधता उद्यानाला आठवड्याला किमान चार टँकर पाणी विविध कामांसाठी लागत आहे. उन्हामुळे पक्ष्यांसाठी ठेवलेले पाणी बाष्पीभवनामुळे लवकर वाफ होऊन जातं व तळ्यातील पाणी प्रतिदिन कमी होतं. ज्यांना ज्यांना आसमंतच्याव तळ्यातील पाणी प्रतिदिन कमी होतं. ज्यांना ज्यांना आसमंतच्या या प्रकल्पामध्ये काही योगदान देण्याची इच्छा असेल त्यांनी मदत करावी, जैवविविधता उद्यानाला जरूर भेट द्यावी, असे आवाहन पटवर्धन यांनी केले आहे.युनोच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, जमिनीवरील शाश्वत विकास उद्दिष्ट क्र. १५ नुसार परिसंस्थांचे संरक्षण, पुनर्संचयित संवर्धन आणि शाश्वत वापर करण्याचा प्रयत्न करणे आहे. यामध्ये जंगलांचे शाश्वत व्यवस्थापन आणि जंगलतोड थांबवणे, वाळवंटीकरणाचा सामना करणे, निकृष्ट जमीन आणि माती पुनर्संचयित करणे, जैवविविधतेचे नुकसान थांबवणे आणि धोक्यात आलेल्या प्रजातींचे संरक्षण करणे यांचा समावेश आहे. हेचं काम आसमंत संस्थेने जैवविविधता उद्यानाद्वारे करत आहे. आसमंत, राष्ट्रीय सागर संस्था तसेच गोगटे-जोगळेकर महाविद्यालय यांच्याबरोबर सागर महोत्सव आणि सागराबाबत संशोधनात्मक काम करून शाश्वत विकास उद्दिष्ट १४ नुसार पाण्याखालील जीवन या विषयावर काम करत आहे.www.konkantoday.com