
ठाकरे शिवसेनेने रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंंघात भास्कर जाधवना ठेवले दूर?
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार व शिवसेना नेते विनायक राऊत यांच्या प्रचाराचा शुभारंभ मंगळवारी येथे आघाडीच्या स्थानिक नेतेमंडळींच्या उपस्थितीत करण्यात आला. मात्र यावेळी तसेच आठवडाभरापूर्वी खासदार राऊत यांनी घेतलेल्या जिल्हा परिषद गटनिहाय कार्यकर्ता बैठकीत शिवसेना उबाठा गटाचे नेते आमदार भास्कर जाधव यांच्या अनुपस्थितीची चर्चा सर्वत्र सुरू झाली आहे. मध्यंतरीचा राडा, स्वपक्षातील गद्दारांवर झालेली टीका या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उबाठाने रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या निवडणुकीपासून जाधव यांना दूर ठेवले नाही ना, अशी चर्चा सुरू झाली आहे.
कोकणाती इतर अनेक समकालीन राजकीय नेत्यांपेक्षा जास्त उजवे कर्तृत्व, संघटन कौशल्य, झपाटून कामाची क्षमता, प्रभावी नेतृत्व हे सारे गुण अंगी असलेले भास्कर जाधव हे कोकणात शिवसेना उबाठाचे महत्वाचे नेते म्हणून ओळखले जातात. राज्याच्या विविध भागात शिवसेना उबाठाची ही तोफ धडाडत असतानाच मध्यंतरी माजी खासदार नीलेश राणे व त्यांच्या समर्थकांमध्ये जोरदार राडा झाला. असंख्य शिवसैनिकांवर गुन्हे दाखल झाले. मात्र गुन्हे दाखल करतानाही स्वपक्षातूनच झालेले राजकारण, करण्यात आलेली गद्दारी या सगळ्याला कार्यकर्त्यांचा मेळावा घेवून जाधव यांनी उत्तर देत तूर्तास शांत राहणे पसंत केल्याचे दिसत आहे.
www.konkantoday.com