पालीतील विवाहितेचे आक्षेपार्ह व्हिडिओ बनवत व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत अडीच लाख रूपयांची मागणी, तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल
रत्नागिरी तालुक्यातील पाली येथे विवाहितेला प्रेमाच्या जाळ्यात ओढून प्रियकराने पैसे उकळण्यासाठी तिचे आक्षेपार्ह व्हिडीओ बनविल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आक्षेपार्ह स्थितीतील हे व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल करण्याची धमकी देत पिडीतेकडून पैसे उकळले तसेच आणखी अडीच लाख रूपयांची मागणी केली. दरम्यान सततच्या ब्लॅकमेलिंगला कंटाळलेल्या पिडीतने अखेर रत्नागिरी ग्रामीण पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी या तरूणाविरूद्ध गुन्हा दाखल केला. कौस्तुभ आदीनाथ वेल्हाळ (27, रा पाली बाजारपेठ) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पिडीत महिला ही 44 वर्षांची असून ती काम करत असलेल्या ठिकाणी आरोपी कौस्तुभ हा सातत्याने ये-जा करत असे. यादरम्यान 2014 पासून आरोपी व पिडीता यांच्यात ओळख निर्माण झाली तसेच मैत्रिचे संबंध निर्माण झाले पुढे जावून याच मैत्रिचे रूपांतर प्रेमसंबधात होवून दोघांमध्ये शरिरसंबंध प्रस्थापित झाले असे महिलेने आपल्या तक्रारअर्जात नमूद केले आहे. दोघांमधील प्रेमसंबंधाची कुणकुण पिडीतेच्या पतीसह नातेवाईकांना लागली. यातून पिडीतेने आपले प्रेमसंबंध यापुढे सुरू ठेवणे शक्य नसल्याचे सांगितले. तसेच आरोपी याला आपल्यापासून दूर राहण्यासंबंधी सांगितले. दरम्यान आरोपी याने पिडीतेला आपल्या सोबतचे आक्षेपार्ह स्थितीतील व्हिडीओ व छायाचित्र समाज माध्यमावर व्हायरल करण्याची धमकी दिली. यातून त्याने पिडीतेकडून पैसे उकळण्यास सुरूवात केली. तसेच कधी स्वतः गळफास घेवून आत्महत्या करणार असल्याचे सांगितले, तर कधी मारहाण करून शारिरिक व मानसिक त्रास देण्यास सुरूवात केली.
आरोपीच्या त्रासाला कंटाळून पिडीतने अन्य ठिकाणी जावून राहण्यास सुरूवात केली. यावेळी देखील आरोपी याने तिचे व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत अडीच लाख रूपयांची मागणी केली अशी तक्रार पिडीतेने रत्नागिरी ग्रामीण पोलिसांत दाखल केली
www.konkantoday.com