
पाचल पंचक्रोशी शिक्षण मंडळाच्या सभेवरून तणाव, मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त
राजापूर तालुक्यातील पाचल पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाने आयोजित केलेल्या सर्वसाधारण सभेला संस्थेच्या पदाधिकार्यांनी आक्षेप घेतल्याने तालुका प्रशासनाने जमावबंदी लागू केली. सभास्थानी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दरम्यान संस्थाध्यक्ष राजेश सावंत यांनी ही सभा तहकूब केली असली तरी पाचलमध्ये दिवसभर तणावपूर्ण वातावरण होते.पाचल पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ या शैक्षणिक संस्थेची सर्वसाधारण सभा रविवारी पाचल सरस्वती विद्यामंदिरच्या वाडिया सभागृहात आयोजित करण्यात आली होती. परंतु संस्थेच्या दत्ताराम गोरूले, आत्माराम सुतार व इतर सभासदांनी संस्थेच्या कारभाराबाबत तसेच जिल्ह्यात मनाई आदेश असताना पाचल पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाने आयोजित केलेल्या सभेत नवीन व जुने सभासद एकत्र येवून वाद होण्याची शक्यता असल्याची तक्रार रत्नागिरी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती.याा वादाच्या अनुषंगाने पाचल परिसरात ३० मार्च २०२४ रोजी रात्री १२ वाजल्यापासून ते ३ एप्रिल २०२४ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत जमावबंदीचे आदेश तहसीलदार तथा दंडाधिकारी राजापूर यांनी लागू केले होते. तसेच पाचल प्रशालेच्या परिसरात रविवारी पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. राजापूर लांजा उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, ठाणे अंमलदारांसह जवळपास ५० पोलिसांचा ताफा पाचलमध्ये दाखल झाल्याने पोलीस छावणीचे स्वरूप आले होते. www.konkantoday.com