
रत्नागिरी-सिंधुदुर्गची जागा शिंदे शिवसेनेचीच, पालकमंत्री उदय सामंत
रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात शिवसेनेचाच खासदार असून बहुसंख्य आमदार देखील शिवसेनेचेच आहेत. विद्यमान खासदार विनायक राऊत हे सध्या आामच्या सोबत नसले तरी ही जागा परंपरागत शिवसेनेचीच आहे. येत्या काही दिवसात या जागेसंबंधी निर्णय होणार असून पुढील चार दिवसात या ठिकाणी महायुतीकडून उमेदवार जाहीर करण्यात येईल, असे मंत्री उदय सामंत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.महाविकास आघाडीकडून शिवसेना उबाठा पक्षाकडून विद्यमान खासदार विनायक राऊत यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे आता महायुतीकडून कोण उमेदवार निवडणूक रिंगणात उतरणार, याची उत्सुकता लागून राहिली आहे. शिवसेना शिंदे गट व भारतीय जनता पक्षाकडून या मतदार संघावर दावा करण्यात येत आहे. भाजपकडून केंद्रीय मंत्री नारायण राणे, माजी आमदार प्रमोद जठार व माजी मंत्री विनोद तावडे यांच्या नावाची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. तर शिंदे गटाकडून उद्योगमंत्री उदय सामंत यांचे ज्येष्ठ बंधु किरण सामंत यांचे नाव चर्चेत आहे. दरम्यान, रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या जागेवरुन मुंबईत खलबते रंगली जात असल्याचे सांगण्यात येत आहे. १२ एप्रिल रोजी रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदार संघासाठी अधिसुचना जारी होणार असून १९ एप्रिल २०२४ पर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख आहे. यामुळे महायुतीचा येत्या काही दिवसात उमेदवार जाहीर करावा लागणार आहे.www.konkantoday.com