
गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेगाड्यांचे आरक्षण १२० दिवस आधी म्हणजेच १० मे पासून खुले होणार
यंदा ७ सप्टेंबरपासून गणेशोत्सवाची धामधूम सुरू होणार आहे. कोकण मार्गावर सोडण्यात येणार्या रेल्वेगाड्यांचे आरक्षण १२० दिवस आधी म्हणजेच १० मे पासून खुले होणार असल्याने गणेशभक्त कमालीचे सुखावले आहेत. नियमित रेल्वे गाड्यांसह गणपती स्पेशल गाड्यांची आरक्षित तिकिटे मिळविण्यासाठी चाकरमान्यांची तिकिट खिडक्यांवर चढाओढ सुरू होणार आहे.गणेशोत्सवासाठी लाखो चाकरमानी कोकणात डेरेदाखल होतात. कोकणात जाणार्या सर्व गाड्यांचे बुकींग २ ते ३ मिनिटातच हाऊसफुल्ल होत असल्याने आरक्षित तिकिटासाठी तिकिट खिडक्यांवर तासनतास ताटकळत उभे राहूनही चाकरमान्यांच्या पदरी निराशाच पडते. यंदा ७ सप्टेंबरला गणरायाचे आगमन होणार आहे. गणेशाोत्सव कालावधी कोकण मार्गावरून धावणार्या नियमित गाड्यांव्यतिरिक्त सोडण्यात येणार्या गणपती स्पेशल गाड्यांची आरक्षित तिकिटासाठी ऑनलाईनप्रमाणेच तिकिट खिडक्यांवरही गर्दी उसळणार आहे. कोकण मार्गावर नेमक्या किती गणपती स्पेशल चालवणार हे अद्याप रेल्वे प्रशासनाने जाहीर केलेले नाही. मात्र १० मे पासून गणेशोत्सवात धावणार्या गाड्यांचे आरक्षण खुले होणार आहे. यामुळे चाकरमान्यांना गणपतीसाठी गावी येण्याचे नियोजन करणे सुकर होणार आहे. नियमित गाड्यांसह गणपती स्पेशल गाड्यांंचे आरक्षण अवघ्या काही मिनिटातच फुल्ल होत आहे. त्यामुळे चाकरमान्यांना प्रतिक्षा यादीवरच रहावे लागते. www.konkantoday.com