
महावितरणाने ग्राहकाला चक्क पाठवले तब्बल 1 लाख 68 हजार 830 रुपये वीज बिल.
पाचल महावितरण कार्यालयाच्या वतीने तळवडेतील ग्राहक गोरख बाबाजी घालमे यांना तब्बल 1 लाख 68 हजार 830 रुपये वीज बिल दिले आहे. हे अवास्तव व भरमसाठ बिल पाहून त्यांच्या पत्नी श्रीमती वर्षा गोरख घालमे यांना मोठा मानसिक धक्का बसला आहे.श्रीमती घालमे या हार्टच्या पेशंट असल्याने त्यांच्या जीवाचे बरेवाईट झाल्यास याला जबाबदार कोण, असा संतप्त सवाल त्याचे पुत्र निशिकांत घालमे यांनी उपस्थित केला आहे.
आम्ही नियमीत वीज भरणा करीत असून कधीही वीज बिल थकीत ठेवलेले नसताना आम्हाला इतक्या मोठ्या रकमेचे बिल देऊन आम्हाला मानसिक त्रास तर दिला असून वीज कापण्याची धमकी देऊन आमची समाजामध्ये बदनामी केली आहे. आपण या महावितरणच्या या भोंगळ, मनमानी कारभाराविरोधात ग्राहक मंचाकडे तक्रार दाखल करून न्यायालयाही दावा दाखल करणार असल्याचे निशिकांत घालमे याांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.मी आणि माझी आई असे दोघेजणच तळवडे येथील छोट्याशा घरात राहतो.
आजपर्यत आम्हाला 500 ते 600 च्यावर कधीही बिल आलेले नाही आणि आलेले बिल कधीही थकित ठेवलेले नाही. अचानक आलेले हे अवास्तव भरमसाठ बिल पाहून आम्हाला धक्काच बसला असून अम्ही घरची सर्व मंडळी तणावाखाली असल्याचे घालमे यांनी सांगितले. आम्ही या बिलाबाबत विचारणा केली असता तांत्रिक चुकीमुळे हे बिल आले असेल, चौकशी करून तुम्हाला सांगतो, असे सांगितले. त्यानंतर घालमे यांना 48 हजार रुपयांचे बिल दिले. आम्हाला हे 48 हजार रुपयांचे बिल ही मान्य नाही.
युनीट प्रमाणे बिल दया, ते आम्ही भरण्यास तयार असल्याचे घालमे यांनी सांगितले. त्यानंतर 48 हजारावरून 6 हजार रूपये बिल देऊन भरण्यास सांगितले. आम्ही 6 हजार रूपये बिल भरण्यास भरण्यास गेलो असता, तुम्ही 48 हजार रूपये बिल भरले पाहिजे, असे सांगण्यात आले. अखेर महावितरणच्या भोंगळ, मनमानी कारभाराविरोधातआम्ही आता ग्राहक मंच व न्यायालयात दाद मागणार असल्याचे निशिकांत घालमे यांनी सांगितले