ठेकेदारांची देयके तत्काळ मिळावीतअन्यथा नाईलाजस्तव ठेकेदारांना सर्व कामे बंद करावी लागतील
रत्नागिरी जिल्हा ठेकेदार असोसिएशनने बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांना निवेदन देत ठेकेदारांची बिले न मिळाल्यास सर्व विकासकामे बंद ठेवण्याचा इशारा दिला आहे.जिल्हा कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनने दिलेल्या निवेदनात नमूद केल्याप्रमाणे या आर्थिक वर्षात देयके न मिळाल्यामुळे आर्थिक ठेकेदार अडचणीत आलेला आहे. देयकांवर इन्कम टॅक्स आणि जीएसटी भरताना ठेकेदारांना गंभीर परिणाम भोगावे लागत आहेत. सर्व ठेकेदार एमएसएमईमध्ये नोंदणीकृत आहेत. ३१ मार्च अखेर सुक्ष्म व लघू उपक्रम आणि एमएसएमईमधील कामांवर ठेकेदारांना आयकर भरावा लागणार आहे. त्यामुळे ठेकेदारांचे आर्थिक नुकसान होणार आहे. सद्यःस्थितीत कामांसाठी लागणारे साहित्य, मजूर, बँक पुरवठादार आदींची उधारी रक्कम देणे शिल्लक आहे. झालेल्या कामांची या आर्थिक वर्षामध्ये देयके अदा न झाल्याने उर्वरीत कामांसाठी साहित्य तसेच मजूर उपलब्ध होणार नाहीत. परिणामी ही कामे बंद ठेवावी लागणार आहेत. पावसाळ्यापूर्वी उर्वरीत कामे पूर्ण न झाल्यास वाहन अपघातांची शक्यता उद्भवू शकते आणि सर्वसामान्य जनतेची गैरसोय होणार आहे. या सर्व बाबींचा विचार करता ठेकेदारांची देयके तत्काळ मिळावीत. अन्यथा नाईलाजस्तव ठेकेदारांना सर्व कामे बंद करावी लागतील. या विषयांची गांभीर्याने दखल घेऊन आम्हा ठेकेदारांचा प्रश्न तत्काळ मार्गी लावावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.www.konkantoday.com