उन्हाळ्यात कुलर वापरताना विद्युत सुरक्षेची काळजी घ्यावी, महावितरणचे नागरिकांना आवाहन

कोकण परिमंडळ :  सध्या तापमानाचा पारा चढला आहे.  वाढत्या तापमानापासून बचावासाठी वातानुकूलन यंत्राचा वापर वाढतो. त्यात कुलरच्या वापरास पसंती दिली जाते. कुलरच्या थंड हवेचा गारवा अनुभवताना विद्युत सुरक्षेबाबत नागरिकांनी काळजी घ्यावी, असे महावितरणचे आवाहन आहे.कुलर वापरत असताना ओल्या हाताने तो चालू वा बंद करणे, त्यास स्पर्श करणे कटाक्षाने टाळावे. कुलरमध्ये पाणी भरण्यापूर्वी वीज पुरवठा बंद करावा. कुलरची मांडणी करताना कुलरच्या सान्निध्यात लहान मुले येणार नाहीत, अशा पध्दतीने करावी. कुलरच्या पंख्यासमोर जाळी लावलेली असावी. त्यामुळे लहान मुलांचा हात कुलरच्या पंख्यात जाणार नाही. कुलरसाठी थ्री पिन प्लग व सॉकेटचा वापर करावा. कुलरच्या वीजतारांचे (वायर्सचे) आवरण सुस्थितीत असल्याची खात्री करावी. जुन्या, कालबाह्य व जोड वायर्सचा वापर करू नये. जुने कुलर वापरात घेताना तपासणी व तांत्रिक बिघाड दुरुस्ती मान्यताप्राप्त व्यवसायिक तंत्रज्ञाकडून करून घ्यावी.आपल्या घरातील,व्यवसायाच्या ठिकाणच्या विद्युत संच मांडणीतील अर्थिंग सुस्थितीत असल्याची तपासणी परवानाधारक विद्युत कंत्राटदाराकडून करून घ्यावी. जुन्या वायरिंगची तपासणी करून खराब झालेली तसेच आवरणाची रोधक क्षमता कमी झालेली वायरींग तात्काळ बदलण्यात यावी.  विद्युत संच मांडणीत अर्थ लीकेज सर्किट ब्रेकर्स बसवणे गरजेचे आहे. त्यामुळे विजेचा धक्का लागल्यास वीज प्रवाह तत्काळ खंडित होऊन पुढील अनर्थ टळतात. विद्युत सुरक्षेच्या कारणासाठी आयएसआय प्रमाणित विद्युत उपकरणांचा वापर करावा. एखाद्यास विजेचा धक्का बसल्यास कोरड्या लाकडाने त्या व्यक्तीस स्पर्श न करता बाजुला करावे. विद्युत उपकरणे तात्काळ बंद करावीत. त्वरित कृत्रिम श्वास देत त्या व्यक्तीस नजिकच्या रुग्णालयात नेण्यात यावे. अपघात टाळण्यासाठी ’प्रतिबंध हाच उपाय’ या तत्वानुसार नागरिकांनी विद्युत सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करून संभाव्य जीवित वा वित्तहानी टाळावी,असे महावितरणचे आवाहन आहे. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button