माशांच्या टंचाईमुळे बाजारात वाढले दर
अलिकडे मासे खवय्यांना मार्केटमध्ये चांगले मासे मिळेनासे झाल्याची स्थिती उभी आहे. समुद्रातील वादळी वार्यामुळे माशांचे होणारे स्थलांतर आदी कारणामुळे स्थानिक मच्छिमार नौकांना मासळी मिळेनाशी झाली आहे. अगदी किरकोळ प्रमाणात मासळी मिळत असून त्याचेही दर वधारले आहेत. सध्या मासेमारीवर संक्रात आल्याचे चित्र निर्माण झाले आहे.रत्नागिरी जिल्ह्याला १६७ कि.मी.च्या लाभलेल्या समुद्रकिनार्यावर सध्या मत्स्य दुष्काळासारखी स्थिती उभी आहे. जिल्ह्यात २ हजार ५२० सागरी मासेमारी नौका असून त्यापैकी २ हजार ७४ यांत्रिकी आणि २७२ पर्ससीननेट मच्छिमार नौका आहेत. पण मागी दोन महिन्यांपासुन येथील मासेमारी व्यवसाय कोलमडल्याची स्थिती उभी आहे. ऐन शिमग्याच्या कालावधीत समुद्रात मासेमारीसाठी जाणार्या मच्छिमारांच्या जाळ्यात मासे मिळत नसल्याची स्थिती आहे. मासळी तुटवड्यामुळे दैनंदिन खर्चही मासेमारीतून निघत नसल्याने नौका मालक आर्थिकदृष्ट्या अडचणीत आल्याचे बोलले जात आहे. मोठ्या प्रमाणात मच्छिमारांना मासळी मिळत नसल्याने बाजारात उपलब्ध मासळीचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे मासे खवय्यांना थोडीसी मुरड घालावी लागत आहे. समुद्रातील वादळी वार्यामुळे माशांचे होणारे स्थलांतर आदी कारणांमुळे मासळीचा रिपोर्ट नसल्याचे सांगण्यात आले. पापलेट माशाची टंचाई निर्माण झाली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून मासेमारीचे हे संकट उभे आहे. त्यामुळे पारंपारिकसह पर्ससीननेट नौकाधारक कमालीचे हैराण झाले आहेत. www.konkantoday.com