
कुंभार्ली घाटात उलटला लाकूडवाहू ट्रक
चिपळूण : चिपळूण ते कराड असा लाकूड घेऊन जाणारा ट्रक कुंभार्ली घाटात रात्री रस्त्यावरच उलटला. यामध्ये चालकाला किरकोळ दुखापत झाली. घाटात दरड कोसळल्याने एकेरी वाहतूक सुरू होती. त्यातच हा अपघात झाल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली. मंगळवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास अपघात घडला. जोरदार पाऊस कोसळत आहे. त्यातच परशुराम आणि कुंभार्ली घाटात दरडी कोसळू लागल्या आहेत. कुंभार्ली घाटात मंगळवारी दुपारी दरड कोसळल्याने घाटातील वाहतूक एकेरी होती. सायंकाळी दरड हटवल्यानंतर वाहतूक पूर्ववत झाली. मात्र, रात्री दहा वाजता एक ट्रक उलटल्याने पुन्हा एकेरी वाहतूक सुरू होती. चिपळूण येथून जळाऊ लाकूड घेऊन भरलेला ट्रक (एमएच-10-झेड-1601) चालक कराडकडे घेऊन निघाला होता. हा ट्रक कुंभार्ली घाटात पलटी झाला. ट्रक रस्त्यावरच उलटला होता. त्यामुळे चालक किरकोळ जखमी झाला. या संदर्भात शिरगाव पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद नाही.