राज्यासह जिल्ह्यात उष्मा वाढणार, उष्माघाताचा त्रास झाल्यास तत्काळ उपचार घ्या आरोग्य विभागाच्या सूचना
मार्च महिन्याच्या मध्यावधीतच रत्नागिरी शहरासह जिल्ह्यातील तापमानाचा पारा ३६ अंशावर गेला आहे. एप्रिल आणि मे महिन्यात तापमान आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे उन्हाचा तडाखा वाढून उष्माघाताचा धोका वाढण्याची शक्यता आहे. भरदुपारी शेतातील व कष्टाची कामे टाळावीत. उष्माघाताचा त्रास जाणवल्यास तत्काळ उपचार घ्यावेत. नागरिकांनी उष्माघात होवू नये यासाठी आतापासूनच सजग रहावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य विभागाने केले आहे.उष्णतेच्या लाटेमुळे शरीरावर गंभीर परिणाम होण्याची तसेच प्रसंगी शारिरीक ताण पडून मृत्यू ओढविण्याची शक्यता आहे. त्यामुळे उष्माघात होवू नये यासाठी आतापासून जागरूक राहिले पाहिजे. रूग्णांना तातडीने औषधोपचार मिळण्यासाठी जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र व आरोग्य उपकेंद्रस्तरावर प्रथमोपचार व उष्माघात नियंत्रणाच्या अनुषंगाने आवश्यक औषधी व साहित्य सामग्री सुसज्ज ठेवण्यात आली आहेत. नागरिकांनी उन्हापासून वाचण्यासाठी सकाळीच महत्वाची कामे करून घ्यावीत. दुपारी घराबाहेर न पडता सायंकाळी ६ वाजलेनंतर घराबाहेर पडावे. www.konkantoday.com