तुमचे पैसे — तुमचा हक्क!” निष्क्रिय ठेव शोध मोहीम रत्नागिरीत सुरू

वित्तीय सेवा विभाग (DFS), भारत सरकार आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) यांच्या मार्गदर्शनाखाली, जिल्हा अग्रणी बँक — बँक ऑफ इंडिया यांच्या पुढाकाराने “निष्क्रिय ठेव (Unclaimed Deposits) शोध मोहीम” रत्नागिरी जिल्ह्यात सुरू करण्यात आली आहे. ही मोहीम 1 ऑक्टोबर 2025 ते 31 डिसेंबर 2025 या कालावधीत राबविण्यात येणार आहे.

या मोहिमेचा उद्देश नागरिकांना त्यांच्या निष्क्रिय ठेवींबाबत जागरूक करणे व त्यांच्या हक्काची रक्कम परत मिळवून देणे हा आहे. DFS च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, ज्या खात्यांमध्ये सलग 10 वर्षांहून अधिक काळ कोणताही व्यवहार झालेला नाही, अशा ठेवी “निष्क्रिय” मानल्या जातात. अशा रकमा नंतर रिझर्व्ह बँकेच्या Depositor Education and Awareness Fund (DEAF) मध्ये वर्ग केल्या जातात.

रत्नागिरी जिल्ह्यातील विविध बँकांकडून सुमारे ₹74 कोटींची रक्कम या निधीत वर्ग झाल्याचे समोर आले आहे. नागरिकांना त्यांच्या निष्क्रिय ठेवींची माहिती RBI च्या UDGAM (Unclaimed Deposits Gateway to Access Information) पोर्टलवर https://udgam.rbi.org.in या संकेतस्थळावर पाहता येते. या पोर्टलद्वारे खाते क्रमांक, पॅन किंवा मोबाईल क्रमांकाच्या आधारे विविध बँकांतील निष्क्रिय खाती शोधता येतात.

जनजागृती वाढवण्यासाठी सर्व बँकांकडून तालुका आणि पंचायत समिती स्तरावर शिबिरे आयोजित केली जात आहेत. या मोहिमेअंतर्गत नागरिकांना त्यांचे बँक खाते तपासून, संबंधित शाखेशी संपर्क साधून निष्क्रिय ठेवींची रक्कम परत मिळविण्यास प्रोत्साहित केले जात आहे.

जिल्हा अग्रणी व्यवस्थापक श्री. दर्शन दत्ताराम कानसे यांनी सर्व नागरिकांना आवाहन केले आहे की,
“आपल्या तसेच आपल्या नातेवाईकांच्या नावावरील खाती तपासा आणि ‘तुमचे पैसे — तुमचा हक्क!’ या मोहिमेचा लाभ घ्या.”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button