
राजापुरात न. प.ने केले दहा फ्लॅट सील, पन्नासहून अधिक जणांचा पाणीपुरवठा बंद
राजापूर : येथील नगर परिषदेच्या थकीत मालमत्ता आणि पाणीपट्टी वसुलीसाठी मुख्याधिकारी प्रशांत भोसले यांच्या नेतृत्वाखाली प्रशासनाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. मालमत्ता कर थकीत असलेल्या दहा फ्लॅटधारकांना मालमत्ता सील करण्याची अंतिम नोटीस प्रशासनाने बजावली आहे. तर, पंचावन्नहून अधिक नळसंयोजनांचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे.
कोरोनाच्या महामारीमध्ये गतवर्षीची थकीत राहिलेली कराची रक्कम आणि यावर्षीची कररक्कम अशा कर रक्कमेची नगर परिषदेकडून वसुली केली जात आहे. त्यामध्ये 3 हजार 436 मालमत्ताधारकांकडून 1 कोटी 20 लाख 92 हजार 735 रुपयांची मालमत्ता कर आकारणी केली जात आहे. त्यापैकी शासकीय येणे वगळता 78 लाख 77 हजार 16 रुपयांची म्हणजे 65.14 टक्के वसुली झाली आहे. तर, सुमारे 2 हजार 556 नळ संयोजनधारकांकडून 40 लाख 55 हजार 544 रुपयांची पाणीपट्टी करवसुली केली जाणार आहे. त्यापैकी शासकीय येणे वगळता 30 लाख 24 हजार 370 रुपये म्हणजे 74.57 टक्के वसुली झाली आहे.
दरम्यान, कराच्या थकीत रक्कमेची वसुली करण्यासाठी प्रशासनाने मुख्याधिकारी श्री. भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यामध्ये मालमत्ता कर थकीत असलेल्या एकाच सदनिकेतील दहा फ्लॅटधारकांना मालमत्ता सीलची अंतिम नोटीस बजावली आहे. तर, पंचावन्नहून अधिक नळसंयोजनांचा पाणीपुरवठा थांबविला आहे. थकीत करवसुलीची मोहीम पुढेही सुरू राहणार आहे.