खेडमधील शिमग्यातील अनोखी प्रथा, प्रतिकात्मक मढे काढून शहराची काढली दृष्ट
कोकणातील प्रमुख सणांपैकी एक सण म्हणजे शिमगोत्सव आणि याच शिमगोत्सवामध्ये अनोख्या प्रथा परंपरेनुसार साजर्या केल्या जातात. खेडमध्ये अशाच प्रकारे अनोखी प्रथा गेल्या शेकडो वर्षापासून जोपासली जाते, ती म्हणजे प्रतिकात्मक मढे काढणे. हुताशनी पौर्णिमेदिवशी देवीचा होम लागल्यानंतर त्याच दिवशी मध्यरात्री १२ वाजता मढे म्हणजेच प्रेतयात्रा काढून शहराची एक प्रकारे दृष्ट काढली जाते. एखाद्या खर्याखुर्या प्रेतयात्रेप्रमाणे सर्व विधी पूर्ण करून हे मढे संपूर्ण शहराच्या सीमेवरून मध्यरात्री बारा वाजता फिरवले जाते आणि पुन्हा पाथरजाई देवीच्या होमामध्ये आणून टाकले जाते. ही आगळीवेगळी प्रथा यंदाही मोठ्या उत्साहात साजरी केली गेली.हुताशनी पौर्णिमेच्या दिवशी देवी पाथरजाईचा होम लागल्यानंतर मध्यरात्री १२ वाजता शहरातील गांधी चौक येथून प्रतीकात्मक मढे काढले गेले. खेडची वर्षभरासाठी इडापिडा दूर जाण्यासाठी प्रतीकात्मक मढे काढून केलेला हा कार्यक्रम म्हणजे शहराची काढलेली एक प्रकारची दृष्ट असते. खेडची ग्रामदेवता काळजाई, पाथरजाई, खेडजाई देवींकडे लोकांना चांगले आरोग्य मिळू दे, त्यांची भरभराट होवू दे, अशी गार्हाणे यंदा मांडण्यात आले आहे.www.konkantoday.com