
रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयास नाममात्र भाडेकराराने जागा- अॅड. दीपक पटवर्धनमंत्री उदय सामंत यांचे प्रयत्न
रत्नागिरी : रत्नागिरीचे सांस्कृतिक केंद्र, वाचकांची वाचनतृष्णा भागवणाऱ्या रत्नागिरी जिल्हा (नगर) वाचनालयाच्या ३० वर्षांसाठी जागेचे लीज वाढवून मिळण्यात यश आल्याची माहिती वाचनालयाचे अध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी दिली. राज्याचे उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या प्रयत्नातून हा निर्णय गेल्या महिन्यात झाला. त्याचे अधिकृत पत्र वाचनालयास प्राप्त झाल्याचे अॅड. पटवर्धन म्हणाले.रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालय हे महाराष्ट्रातले सर्वांत जुने १९६ वर्षांचे वाचनालय आहे. १ लाख १३ हजार ग्रंथांनी समृद्ध असलेले ऐतिहासिक परंपरा असलेले वाचनालय एक अत्यंत दर्जेदार वाचनालय म्हणून महाराष्ट्रभर ओळखले जाते. या वाचनालयाच्या जागेचा भाडेपट्टा १९९२ मध्ये संपुष्टात आला होता. १९५१ पूर्वीपासून हे वाचनालय सध्या आहे त्या जागेवर उभे आहे. मात्र ही जागा नगरपालिकेची व इमारत नगर वाचनालयाच्या मालकीची अशी स्थिती आहे. भाडेपट्टा वाढवून मिळावा म्हणून अनेक वेळा प्रयत्न झाले. मात्र राजकीय हेवेदाव्यातून हे प्रकरण मार्गी लागत नव्हते.अॅड. पटवर्धन यांनी यासाठी सातत्याने प्रयत्न केले. मंत्री उदय सामंत यांच्याकडे हा विषय मांडला. भाजपा जिल्हाध्यक्ष असताना मुख्यमंत्र्यांकडेही याबाबत पाठपुरावा केला होता. मात्र अनेक तांत्रिक गोष्टींची अडचण येत होती. अखेर मंत्री सामंत यांनी आपला प्रभाव वापरून सर्व तांत्रिक अडचणी दूर करत मुख्यमंत्र्यांकडे हाविषय मांडून वाचनालयाला २०१८ पासून ३० वर्षासाठी नाममात्र १ रुपया भुईभाड्याने आहे ती संपूर्ण जागा उपलब्ध करू दिली. शासनाने रत्नागिरी नगर वाचनालयास ३० वर्षे मुदतीने जागा देण्याचा शासन निर्णय १३ फेब्रुवारी रोजी पारीत झाला.अनेक वर्षे रत्नागिरी नगर वाचनालयावरच्या जागेचा प्रलंबित प्रश्न मार्गी लावल्याबद्दल अध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी मंत्री उदय सामंत, मुख्यमंत्री, रत्नसिंधू योजनेचे संचालक किरण तथा भैय्या सामंत, रत्नागिरी नगरपालिका, जिल्हाधिकारी या सर्वांना धन्यवाद दिले आहेत. खूप किचकट असणारे हे प्रकरण अनंत अडचणी दूर करत मार्गी लागले, याचे खूप समाधान आहे. आता नव्या इमारीचा मार्ग मोकळा होईल, अशी प्रतिक्रियाही अॅड. पटवर्धन यांनी दिली.