महाबळेश्वर येथील आंबेनळी घाटात मिनी टेम्पो दरीत कोसळला, चारजण जखमी
सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथील आंबेनळी घाटात सोमवारी दुपारच्या सुमारास मिनी टेम्पो दरीत कोसळून चौघे गंभीर जखमी झाले. सर्व जखमींना महाबळेश्वर ट्रेकर्स, सह्याद्री ट्रेकर्स व प्रतापगड ट्रेकर्सच्या जवानांच्या बचावकार्याने सुखरूप बाहेर काढले.पुणे येथील टाटा मोटर्सचे ३ योद्धा टेम्पो हे घाटातील टेस्ट ड्राईव्हसाठी पुणे ते पोलादपूर प्रवासाला निघाले होते. कात्रज खंडाळा येथी खंबाटकी तर वाई येथील परसणी घाटात टेस्ट ड्राईव्ह पार करून हे ३ टेम्पो महाबळेश्वर मार्गे आंबेनळी घाटातून पोलादपूरला जात होते. त्यातील तीनपैकी एका टेम्पोचालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने सुरक्षा कठडा तोडून ३०० फुट खोल दरीत कोसळला. यावेळी अन्य २ टेम्पोमधील लोकांनी अपघाताची खबर मेटतळे गावातील लोकांना दिली असता काही तरूणांनी अपघातस्थळी धाव घेत दरीत उतरून मदतकार्य हाती घेतले. जखमींमध्ये टेम्पो चालक देवदत्त वाघ व इंजिनियर राजेंद्र खाणे हे गंभीर जखमी असून त्यांना पुण्यातील रूग्णालयात हलविण्यात आले आहे. www.konkantoday.com