
विराट कोहलीचा कसोटी क्रिकेटला अलविदा! भावूक पोस्ट शेअर करत म्हणाला..
:* गेल्या आठवड्याभरात भारतीय क्रिकेट चाहत्यांना दोन मोठे धक्के बसले आहेत. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करून अचानक कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला होता. क्रिकेट चाहते या धक्क्यातून बाहेर पडणार,त्याआधीच विराटने चाहत्यांना आणखी एक मोठा धक्का दिला आहे. आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून भावूक पोस्ट शेअर करून विराटने कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याची घोषणा केली आहे. विराटच्या या निर्णयामुळे क्रिकेट चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
विराट कोहलीने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून पोस्ट शेअर करत कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली आहे. त्याने आपल्या पोस्टला कॅप्शन देत लिहिले की, ” टीम इंडियाची कसोटी कॅप परिधान करून मला १४ वर्ष झाली. खरं सांगू तर, हा प्रवास मला कुठे नेईल, याची मला काहीच कल्पना नव्हती. या प्रारुपाने माझी परीक्षा पाहिली, मला घडवलं आणि आयुष्यभरासाठी शिदोरी दिली.”तसेत त्याने पुढे लिहिले की, ” टीम इंडियासाठी कसोटी खेळणं हे माझ्यासाठी नेहमीच खास होतं. या फॉरमॅटपासून दूर जाण्याचा निर्णय मुळीच सोपा नव्हता, पण योग्य वाटतो. मी या खेळासाठी सर्वकाही दिलं. त्याहून अधिक या खेळाने मला परत दिलं. कृतज्ञ भावनेने भरलेल्या हृदयानं मी कसोटीचा प्रवास थांबवतोय.”
रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर विराट कोहलीनेही कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र,येत्या जून महिन्यात भारतीय संघ ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यासाठी इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. हा दौरा पाहता बीसीसीआयने त्याला आपल्या निर्णयावर फेरविचार करण्याची विनंती केली होती. मात्र, विराट आपल्या निर्णयावर ठाम राहिला. अखेर आज त्याने १४ वर्षांच्या कसोटी कारकिर्दीला पूर्णविराम दिला आहे. विराटच्या निवृत्तीनंतर अनेक दिग्गज खेळाडूंनी त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
*विराट कोहली हा कसोटी कारकिर्दीतील दिग्गज फलंदाजांपैकी एक आहे. कसोटी क्रिकेटमध्ये त्याच्या नावे अनेक मोठ्या विक्रमांची नोंद आहे. विराटने २०११ मध्ये वेस्टइंडिज दौऱ्याहून आपल्या कसोटी कारकिर्दीला सुरूवात केली होती. त्याला कसोटी क्रिकेटमध्ये १२३ सामने खेळण्याची संधी मिळाली. यादरम्यान २१० डावात फलंदाजी करताना त्याने ४६.९ च्या शानदार सरासरीने ९२३० धावा केल्या. यादरम्यान त्याने ३० शतकं आणि ३१ अर्धशतकं झळकावली. यादरम्यान नाबाद २५४ धावा ही त्याच्या कसोटी कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळी ठरली.