होळीमध्ये पादचा-यांच्या अंगावर रंग, पाणी उडविल्यास होणार कारवाई
मोठ्या उत्साहात साज-या करण्यात येणा-या होळी आणि धुलीवंदनाच्या दिवशी कोणतीही अनचित घटना घडू नये यासाठी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. तसेच, पोलिसांनी गस्तीवर भर दिलेला आहे. दुसरीकडे, सार्वजनिक ठिकाणी अंधाधुंदपणे रंगीत पाणी, रंग उडविणे आणि अश्लिल टीका टिप्पणी केल्यास थेट कारवाईचा इशारा पोलिसांनी दिला आहे.गर्दीची ठिकाणे मॉल्स, बाजारपेठा, धार्मिक स्थळे आणि चौपाट्यांवर सीसीटिव्हींच्या माध्यमातून करडी नजर ठेऊन महिलांच्या सुरक्षेसाठी विशेष पथकांकडून गस्त घालण्यात येत आहे. साध्या गणवेशातील पोलीसही सर्व घडामोडीवर लक्ष ठेवून असणार आहे. दुसरीकडे निर्भया पथकाकडून गस्त सुरूच असून, काहीही मदत लागल्यास थेट संपर्क साधण्याचे आवाहनही पोलिसांकडून करण्यात येत आहे. नियंत्रण कक्षातून सर्व घडामोडीवर लक्ष ठेवण्यात येणार आहे.सार्वजनिक ठिकाणी अंधाधुंदपणे रंगीत पाणी मारणे आणि अश्लिल बोलणे यामुळे जातीय तणाव आणि सार्वजनिक शांतता भंग होण्याची शक्यता असते. २३ मार्च ते २९ मार्च दरम्यान अश्लील टीका टिप्पणी, गाणे, तसेच अश्लील इशारे, फलकांचा वापर करू करू नये. पादचा-यांवर रंगीत पाणी, रंग किंवा पावडर फवारणे किंवा फेकणे तसेच, रंगीत किंवा साध्या पाण्याने भरलेले फुगे फेकण्यावर बंदी घालण्यात आली आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्यास महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम १३५ नुसार शिक्षा केली जाणार आहे.www.konkantoday.com