सुट्टयांच्या दिवशी देखील सर्व दुय्यम निबंधक व सहदुय्यम निबंधक कार्यालये दस्त नोंदणीसाठी जनतेच्या सेवेत रत्नागिरी, दि. 23 (जिमाका) – मार्च अखेरीस येणाऱ्या शनिवार 23 मार्च व रविवार 24 मार्च त्याचप्रमाणे दि. 29, 30 व 31 मार्च 2024 या सुट्टयांच्या दिवशी देखील जिल्ह्यातील सर्व दुय्यम निबंधक व सहदुय्यम निबंधक कार्यालये दस्त नोंदणी करण्यासाठी जनतेच्या सेवेत सुरू ठेवण्याचा निर्णय नोंदणी विभागाने घेतला आहे. जनतेने या सुवर्णसंधीचा मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा. आपल्या दस्तांची नोंदणी मुद्रांक शुल्क भरुन करावी, असे आवाहन जिल्ह्याचे सह जिल्हा निबंधक व मुद्रांक जिल्हाधिकारी सूर्यकांत घार्गे यांनी जनतेला केले आहे.
दुय्यम निबंधक कार्यालये मार्च अखेरीस येणाऱ्या सुट्यांच्या दिवशीही जिल्ह्यातील सर्व दुय्यम निबंधक व सह दुय्यम निबंधक कार्यालये दस्त नोंदणीसाठी सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तसा आदेश नोंदणी महानिरिक्षक तथा मुद्रांक नियंत्रक महाराष्ट्र राज्य पुणे हिरालाल सोनावणे यांनी दि. 19 मार्च रोजी पारित केला आहे.दरवर्षी मार्च अखेरीस आर्थिक वर्ष संपत असल्याने जनतेकडुडून स्थावर मिळकतीचे व्यवहार पूर्ण करून, मुद्रांक शुल्क भरुन खरेदी दस्तांची नोंदणी मोठ्या प्रमाणात केली जात असते. त्याचप्रमाणे या वर्षीदेखील दि. 1 एप्रिल पासून स्थावर मिळकतीच्या रेडिरेकनरच्या दरात वाढ होणार असल्यामुळे मार्च 2024 अखेरीस मोठ्या प्रमाणात मुद्रांक शुल्क भरुन दस्त नोंदणी होण्याची अपेक्षा नोंदणी विभाग व्यक्त करीत आहे व तसा अंदाज या क्षेत्रातील तज्ञांकडून देखील व्यक्त होत आहे.000