
*जे. एस. डब्ल्यू जयगड पोर्टच्यावतीने उभारल्या जाणार्या मिरवणे जेटीच्या विरोधात जयगडमधील मच्छिमारांचे उपोषण सुरू*
______रत्नागिरी तालुक्यातील जे. एस. डब्ल्यू जयगड पोर्टच्या मिरवणे जेटीसंदर्भात मच्छिमारांनी केलेल्या मागण्या मान्य होत नसल्याने अखेर जयगड येथील मच्छिमारांनी शुक्रवारपासून आमरण उपोषण सुरू केले आहे. प्रशासनाकडून न्याय मिळत नाही तोपर्यंत हे आमरण उपोषण सुरू ठेवण्याचा निर्णय मच्छिमारांनी घेतला आहे. त्यासाठी जयगडमधील संपूर्ण मासेमारी बंद ठेवण्याबरोबरच मासळी संंटरही बंद ठेवण्याचा निर्णय मच्छिमारांनी घेतला आहे.जयगड मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थेच्या सदस्यांनी हे आमरण उपोषण सुरू केले आहे. जे. एस. डब्ल्यू जयगड पोर्टच्यावतीने उभारल्या जाणार्या मिरवणे जेटीच्या विरोधात मच्छिमारांकडून वारंवार तक्रारी होत आहेत. या बाबत स्थानिक मच्छिमारांनी आंदोलनाचा पवित्रा घेतल्यानंतर यामध्ये पालकमंत्री उदय सामंत यांनी लक्ष घातले होते. त्यानंतर कंपनीचे अधिकारी आणि जिल्हा प्रशासन व पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक झाली होती. पालकमंत्र्यांनी कंपनीच्या अधिकार्यांना खडे बोल सुनावले होते. परंतु कंपनीच्या अधिकार्यांनी बैठकीनंतर मच्छिमारांच्या प्रश्नाकडे फारसे लक्ष दिले नाही. मागण्या मान्य होत नसल्याने २६ जानेवारीला मच्छिमारांनी आंदोलन केले. परंतु त्यावेळीही कंपनी व जिल्हा प्रशासनाने दुर्लक्ष केले. मागील काही दिवस स्थानिक मच्छिमार हा प्रश्न मार्गी लागावा म्हणून प्रयत्नशील होते परंतु त्याकडे दुर्लक्ष झाल्याने अखेर ९ फेब्रुवारीपासून आमरण उपोषण कंपनीच्या गेटसमोर सुरू केले आहे. www.konkantoday.com