
मुंबई, ठाणे आणि रायगड व कोकणातील जिल्ह्यामध्ये रविवारी, सोमवार आणि मंगळवारी उष्णतेच्या लाटेचा इशारा
मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यामध्ये रविवारी, सोमवार आणि मंगळवारी उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. माजी हवामान अधिकारी कृष्णानंद होसाळीकर यांनी या तिन्ही जिल्ह्यांमध्ये 9, 10 आणि 11 मार्च रोजी उष्णतेची लाट येईल, असं सांगितलं आहे.मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील तुरळक ठिकाणी उष्णतेच्या लाटा, तर दक्षिण कोकणातील काही भागांत उष्णतेच्या लाटा येतील, असेही त्यांनी इशारा देताना नमूद केलं आहे.
40 अंश तापमान नोंदविले जाणार
मुंबईचे कमाल तापमान शुक्रवारी (7 मार्च रोजी) 35.8 अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. येत्या बुधवारपर्यंत म्हणजेच उष्णतेची लाट येऊन गेल्यानंतर यात आणखी वाढ होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. 12 मार्चपर्यंत मुंबई महानगर प्रदेशात उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे. पालघर, ठाणे, नवी मुंबई आणि कल्याणमध्ये 40 अंश तापमान नोंदविले जाईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. रविवार ते मंगळवारदरम्यान उन्हाचा तडाखा तीव्र असू शकतो, असा अंदाज आहे.
उष्णतेची लाट म्हणजे काय?
कोकणात उष्णतेची लाट म्हणजे दिवसाचे कमाल तापमान 37 अंशांपेक्षा अधिक नोंदविले जाईल.ते त्या दिवसाच्या सरासरी तापमानापेक्षा 4 अंशांनी जास्त असेल. कोकण विभागात चालू आठवड्याच्या सुरुवातीपासूनच उष्णतेचे चटके जाणवत असून पुढील आठवड्याच्या सुरुवातीपर्यंत हे वातावरण कायम असण्याची शक्यता प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळेच गरज असेल तरच दिवसा बाहेर पडा असं आवाहन करण्यात आलं आहे.