प्रचार साहित्यावर मुद्रक, प्रकाशकांच्या नाव, पत्त्यासह प्रतींची संख्या आवश्यक -जिल्हा निवडणूक अधिकारी एम देवेंदर सिंह रत्नागिरी, दि. 21 (जिमाका) : लोकसभा निवडणुकीसाठी छपाई करण्यात येणाऱ्या प्रचार साहित्यावर मुद्रक, प्रकाशक यांच्या नाव पत्त्यासह त्यावर संख्या असणे आवश्यक आहे. त्यानुसार प्रिंटींग प्रेस ने काम करावे, असे निर्देश जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी दिले.

जिल्ह्यातील प्रिंटींग प्रेस चालक, मालक यांची आज येथील अल्प बचत सभागृहात बैठक घेण्यात आली. बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहूल गायकवाड, उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे आदी उपस्थित होते. अपर जिल्हाधिकारी श्री. बर्गे यांनी याबाबत मार्गदर्शक सूचना सविस्तरपणे सांगितल्या. ते म्हणाले, प्रचार साहित्य छापून घेण्यासाठी येणाऱ्या उमेदवाराकडून दोन ओळखीच्या व्यक्तींच्या सह्यांसह दोन प्रतीमध्ये स्वत:चे घोषणापत्र प्रिंटर्सने घेणे आवश्यक आहे. त्याबरोबरच या घोषणापत्राची एक प्रत जिल्हाधिकारी यांच्याकडे देणे बंधनकारक आहे. त्याचबरोबर छपाई करण्यात आलेल्या प्रचार साहित्यांवर मुद्रक, प्रकाशक यांच्या नाव पत्त्यासह छपाई करण्यात आलेल्याची संख्या द्यायला हवी. हे न दिल्यास संबंधित प्रिंटींग प्रेस मालकाला सहा महिने तुरुंगवास, दोन हजार दंड किंवा दोन्हीही शिक्षा होऊ शकते. जिल्हाधिकारी श्री. सिंह म्हणाले, प्रिंटींग प्रेस चालक मालकांनी या नियमाचा काटेकोरपणे अवलंब करावा. सविस्तर मार्गदर्शक सूचनांचे अवलोकन करुन त्यावर अंमलबजावणी करावी. कोणतीही चूक होणार नाही, याबाबत दक्षता घ्यावी.000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button