
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बेरोजगारीच्या पापाचा धनी विनायक राऊतच-प्रमोद जठार
उद्धव ठाकरेंकडे २०१४ साली विनायक राऊत यांच्या नावाची शिफारस करून त्यांना निवडून आणण्याचे कामदेखील मीच केले होते.मात्र, त्याचा आज आम्हाला पश्चाताप होत आहे. कारण विकास करणे सोडाच उलट या मतदारसंघात होऊ घातलेल्या रोजगाराभिमुख प्रकल्पांना विरोध करण्याचेच एकमेव काम विनायक राऊत यांनी केले. सी वर्ड सारखा जागतिक पर्यटन प्रकल्प तसेच नाणारचा रिफायनरी प्रकल्प झाला असता तर जिल्ह्यातील अनेक बेरोजगारांना नोकरी मिळाली असती. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बेरोजगारीच्या पापाचा धनी विनायक राऊतच असून खासदार बदला नशीब बदलेल, असे आवाहन भाजपचे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ प्रमुख प्रमोद जठार यांनी केले.दरम्यान, खासदार विनायक राऊत यांनी मागील दहा वर्षात टॉवर उभे करण्यापलिकडे काहीच काम केले नाही. त्यामुळे आम्हाला आता विकास करणारा खासदार हवा असून झगडे लावणारा व प्रकल्प होऊन न देणारा खासदार नको. महायुतीकडून दोन दिवसात उमेदवाराचे नाव निश्चित होणार असून आमचा उमेदवार हा विकास करणाराच असेल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.www.konkantoday.com