बहिण भावांचा वाद पेटला, चिपळुणातील मंदार एज्युकेशन सोसायटीच्या चेअरमनसह 7 जणांवर गुन्हा दाखल


चिपळूण तालुक्यातील पेढांबे येथील नामांकित मंदार एज्युकेशन सोसायटीत मोठा वाद निर्माण झाला असून, संस्थेचे चेअरमन मंदार राजाराम शिंदे यांच्यासह सात कर्मचाऱ्यांविरुद्ध चोरी, आर्थिक गैरव्यवहार, मालमत्तेचे नुकसान आणि सामाजिक बहिष्कारासारखे गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत. चेअरमन मंदार शिंदे हे तक्रारदार असलेल्या डॉ. सी. वेदांती विलास सावंत यांचे सख्खे भाऊ आहेत.

डॉ. सी. वेदांती विलास सावंत (वय ६२, सध्या रा. दादर, मुंबई) यांनी पेढांबे पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली आहे. यात मंदार राजाराम शिंदे (चेअरमन, रा. कोळकेवाडी), श्री. जितेंद्र नाना कंचले (अलोरे कॉलनी), विजय रावजी जुने (पेढांबे भराडेवाडी), अनंत गणपत सुतार (कोळकेवाडी पठार), मारुती राणे (कोळकेवाडी पठार), सागर चंद्रकांत शिरगावकर (कुंभळी) आणि श्री. संतोष कदम (मुंढे) या सात जणांना आरोपी करण्यात आले आहे.

तक्रारीनुसार, जानेवारी २०२४ पर्यंत डॉ. सावंत आणि त्यांचे पती हे संस्थेच्या व्हाईस चेअरमन शैलेजा राजाराम शिंदे (फिर्यादींची आई) यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचा संपूर्ण कारभार पाहत होते. मात्र, जानेवारी २०२४ मध्ये चेअरमन मंदार शिंदे यांनी संस्थेत येऊन प्रत्यक्ष कारभार पाहण्यास सुरुवात केली. चेअरमन मंदार शिंदे आणि व्हाईस चेअरमन शैलेजा शिंदे यांनी त्यांच्या अधिकाराचा गैरवापर करून बँक ऑफ इंडिया, पेढांबे शाखेतील संस्थेच्या मुख्य बँक खात्यातून अनेक मोठे आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप डॉ. सावंत यांनी केला आहे.
आरोपी मंदार शिंदे यांनी संस्थेतील ठेकेदार श्री. सतीश बाळकृष्ण शिंदे यांच्या बँक खात्यात अनेक रकमा जमा करून संस्थेच्या पैशांचा अपहार केल्याचा आरोप तक्रारीत आहे. तसेच, चेअरमन मंदार शिंदे यांनी त्यांचे सहकारी जितेंद्र कंचले, विजय जुने, अनंत सुतार, मारुती राणे, सागर शिरगावकर आणि संतोष कदम यांच्या मदतीने संस्थेच्या मालकीची एम.एच.०४. जी. ९९०० क्रमांकाची बस बेकायदेशीररित्या भंगारात विकली. याशिवाय, संस्थेतील जीर्ण झालेले साहित्यही भंगारात विकून अंदाजे २० लाखाहून अधिकची रक्कम स्वतःकडे ठेवून संस्थेत जमा केली नाही, यामुळे संस्थेचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.

सर्वात गंभीर बाब म्हणजे, दिनांक २६/०६/२०२५ रोजी डॉ. सावंत मुंबईत असताना, चेअरमन मंदार शिंदे यांच्या आदेशानुसार इतर सहा कर्मचाऱ्यांनी त्यांच्या संस्थेतील निवासस्थानाचे कुलूप तोडून फिर्यादीच्या परवानगीशिवाय घरात प्रवेश केला. त्यांनी निवासस्थानात चोरी करून मोठे नुकसान केले.

यापूर्वी २४/०३/२०२४ रोजी संस्थेच्या विश्वस्तांच्या बैठकीत डॉ. सावंत यांनी चेअरमन मंदार शिंदे यांना निवासस्थानाची वीज आणि पाणीपुरवठा का बंद केला, अशी विचारणा केली असता, मंदार शिंदे यांनी त्यांना शिवीगाळ व दमदाटी केल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.

डॉ. सावंत यांना संस्थेत तोंडी प्रवेश बंदी करणे, डायल ११२ वर कॉल करून पोलिसांना बोलावणे, निवासस्थानाची वीज तोडणे, पाणी बंद करणे, तसेच विद्युत सापळा रचून फिर्यादीचा अपघात घडवण्याचा प्रयत्न करणे आणि संस्थेच्या कॅन्टीनमध्ये त्यांना अन्नपाणी देण्यास मज्जाव करणे अशा कृती करून त्यांना सामाजिक बहिष्कृत करण्यात आल्याचेही तक्रारीत स्पष्ट केले आहे.

या गंभीर तक्रारीवरून पेढांबे पोलिसांनी आरोपींविरुद्ध भा.दं.वि. कलम ३३१(३), ३३१(४), ३०५, ३०५, ३१६(२), ३१८(४), ३५२, ३५१(२) तसेच सामाजिक बहिष्कार (प्रतिबंध आणि प्रतिबंध) कायद्याचे कलम ३ अंतर्गत गुन्हा दाखल केला असून, पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button