
३ एक्स्प्रेसना संगमेश्वर रेल्वे स्थानकात थांबा द्या!
संगमेश्वर तालुक्यातील स्थानिक लोकप्रतिनिधींनी दिली कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्यांना स्मरणपत्रे!
कोकण रेल्वेशी गेली दिड वर्षे या एकाच मागणीसाठी वारंवार पत्रे, निवेदने निसर्गरम्य चिपळूण व संगमेश्वर फेसबुक ग्रुप आणि स्थानिक लोक प्रतिनिधींनी दिली.
परंतु कोकण रेल्वे प्रशासनाने मागणीच्या पूर्ततेसाठी सर्व बाबी अनुकूल असताना सुद्धा याची गांभीर्याने दखल घेतली नाही आणि हा प्रश्न प्रलंबीत ठेवला आहे. या कारणास्तव निसर्गरम्य चिपळूण आणि संगमेश्वर फेसबुक ग्रुप यांनी २६ जानेवरी २०२५ रोजी , प्रजासत्ताक दिनी एक दिवसीय लाक्षणिक उपोषणाचे अस्त्र उपसले होते त्याला तालुक्यातील सर्व सामान्य जनता, लोकप्रतिनिधी यांनी एकत्रीत येऊन मोठ्या संख्येने पाठिंबा दिला.
यामुळे गोंधळात पडलेल्या रेल्वे प्रशासनाने उपोषणदिनी निवेदन स्विकारले आणि लवकरच सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असे लेखी वचन दिले या वाटाघाटीत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष सुरेश बने, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संतोष खेराडे , निसर्गरम्य चिपळूण संगमेश्वर फेसबुक पेज ग्रुपचे प्रमुख संदेश जिमन यांच्यासह तालुक्यातील अनेकजण सहभागी झाले होते.
यावेळी येत्या महिन्याभरात संगमेश्वर वासीयांच्या मागणीसंदर्भात योग्य निर्णय न झाल्यास रेल रोको करण्याचा इशारा उपस्थित लोक प्रतिनिधींनी कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्यांना दिला.
या घटनेला पंधरा दिवस उलटले अद्याप कोणतीही चर्चा अथवा यासंदर्भात सुतोवाच कोकण रेल्वेकडून करण्यात आलेली नाही.म्हणून संगमेश्वर तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी कोकण रेल्वे प्रशासनाला “स्मरण पत्रे” दिली आहेत.
यात प्रामुख्याने राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष सुरेश बने, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संतोष खेराडे, जनता दल जिल्हाध्यक्ष युयुत्सु आर्ते, शिवसेना उबाठा गटाचे तालुका अध्यक्ष नंदादीप बोरुकर, बहुजन विकास आघाडीचे सुरेश भायजे, नॅशनल कॉग्रेसचे हनिफ खलफे यांचा समावेश आहे.
या घेराबंदीमुळे कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्यांची तातडीने सुत्रे हलवण्याची घाई होणार यात शंका नाही. कुठवर संगमेश्वरची जनता अन्याय सहन करणार?
हा प्रश्न यानिमित्ताने ऐरणीवर आला आहे.
जर या मागण्यांची दखल घेतली नाही तर निदर्शने होणार! आम्ही राजधानी एक्सप्रेस अडवणार!
असा विनंतीवजा गंभीर इशारा या लोकप्रतिनिधींनी कोकण रेल्वेला दिलेल्या पत्रातून दिला आहे.
त्यामुळे आता कोकण रेल्वेचे अधिकारी काय करणार? जे याआधी केले त्याची पुनरावृत्ती करणार की संगमेश्वरच्या जनतेची मागणी मान्य करणार? हे जाणून घेणे औस्तुक्याचा विषय ठरणार हे मात्र नक्की!