साई रिसॉर्टचा अनधिकृत भाग स्वतःहून पाडतो -सदानंद कदम यांची उच्च न्यायालयाला विनंती
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते अनिल परब यांचे निकटवर्ती सदानंद कदम यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील साई रिसॉर्टमधील संबंधित अनधिकृत भाग स्वतःच चार आठवड्यांच्या आत तोडण्याची तयारी उच्च न्यायालयात दर्शविली आहे.पर्यावरण कायदा व सीआरझेड नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल अनधिकृत बांधकाम तोडण्याबाबत अतिरिक्त जिल्हाधिकार्यांनी नोटीस बजावल्यानंतर कदम यांनी ऍड. प्रेरणा गांधी यांच्यामार्फत याचिकेद्वारे त्याला आव्हान दिले. त्या भागात सीआरझेडचे कथित उल्लंघन झालेल्या अनेक वास्तू असताना केवळ मला नोटीस पाठविण्यात आली. तसेच माझ्याविरोधात सुडबुद्धीने कारवाई सुरू करण्यात आली, असा युक्तीवाद कदम यांनी ऍड. साकेत मोने यांच्यामार्फत न्या. माधव जामदार यांच्यासमोर केला होता. तर संबंधित अनेक वास्तूंवरही कारवाई केली असल्याची माहिती विशेष सरकारी वकील राजीव कुमार व सरकारी वकील रिना साळुंखे यांनी न्यायालयाला दिली होती. तसेच अन्य कथित अनधिकृत बांधकामांवर याचिकाकर्त्यांच्या अनधिकृत बांधकामाला संरक्षण मिळते, असे होवू शकत नाही, असा युक्तीवादही सरकारी वकिलांनी मांडला होता. त्याचप्रमाणे अन्य बांधकामांवर झालेल्या कारवाईची माहिती प्रतिज्ञापत्रावर देण्याची तयारी दर्शविली होती. त्यानुसार सरकारतर्फे बुधवारी प्रतिज्ञापत्रात सर्व आवश्यक तपशील नसल्याने सुधारित प्रतिज्ञापत्र दाखल करण्यासाठी अवधी देण्याची विनंती कुमार यांनी न्यायालयाला केली. त्याचवेळी माझे अशील कदम यांच्याकडून मला ईमेल आला आहे. दापोली उपविभागीय अधिकारी यांनी १२ सप्टेंबर २०१७ रोजीच्या आदेशानुसार रिसॉर्टमधील जे अतिरिक्त बांधकाम अनधिकृत असल्याचे म्हटले आहे, ते स्वखर्चाने स्वतःहून तोडण्याची तयारी कदम यांनी दर्शविली आहे. www.konkantoday.com