म्हादई खोरे हा सह्याद्रीचा पट्टा ‘टायगर कॉरिडॉर’ म्हणून घोषित करावा,दोडामार्ग परिसरात दिवसाढवळ्या आढळला पट्टेरी वाघ
_सावंतवाडी तालुक्यातील आंबोली ते दोडामार्ग तालुक्यातील मांगेली अन् पुढे गोव्याचे म्हादई खोरे हा सह्याद्रीचा पट्टा ‘टायगर कॉरिडॉर’ म्हणून घोषित करावा, अशी मागणी वन्यजीव अभ्यासक व पर्यावरणतज्ज्ञ करीत असतानाच शनिवारी दोडामार्ग परिसरात दिवसाढवळ्या एका पट्टेरी वाघाचे दर्शन झाले आहे.शिवसेनेचे दोडामार्ग तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस व त्यांच्या सहकाऱ्यांना हा वाघ दिसून आला. त्यांनी तो आपल्या मोबाइलच्या कॅमेऱ्यात कैद केला. या घटनेमुळे मात्र वन्यजीव अभ्यासकांमध्ये आनंदाचे वातावरण असून, इथली जैवविविधता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.आंबोली ते मांगेली आणि पुढे म्हादई खोरे हा सह्याद्री पट्ट्याचा परिसर जैवविविधतेने संपन्न आहे. या ठिकाणी विविध प्रजातींचे दुर्मीळ पशू-पक्षी आणि प्राणी आढळतात. पट्टेरी वाघाचे अस्तित्व देखील या भागात असल्याचे बोलले जात होते. अनेकदा ते सिद्धही झाले; मात्र वनविभाग अनेकदा ते नाकारत होता; मात्र आता तर पट्टेरी वाघाचे अस्तित्व दाखवून देणारी आणि वनविभागाच्या डोळ्यांत अंजन घालणारी घटना घडली आहे.दोडामार्ग परिसरात पट्टेरी वाघ आढळून आल्याने इथली जैवविविधता समोर आली आहे.www.konkantoday.com