
शहीद झालेल्या अशा शूर वीराना व त्यांच्या कुटुंबांना सलाम !
“- – -त्यांनी मागून हल्ला केला म्हणून नाहीतर माझा यशने तीनजणांना तरी मारले असते” ही प्रतिक्रिया आहे नुकत्याच जम्मू काश्मिरमध्ये शहीद झालेल्या यश देशमुख यांचे वडील दिगंबर देशमुख यांची ,अशा प्रतिक्रिया पहिल्या की वाटते अशा कितीतरी कुटुंबांनी आपल्या कुटुंबातील मौल्यवान जीव देशासाठी अर्पण केले आहेत .अशी किती तरी उदाहरणे आहेत की कुटुंबातील तरणा ताठा मुलगा शहीद झाल्यावर त्याचा भाऊ, किंवा एखाद्या कुटुंबातील पती देशासाठी हुतात्मा झाल्यावर त्यांची पत्नी मोठ्या अभिमानाने सैन्यात भरती होऊन देशाची सेवा करण्यासाठी पुढे येत आहे . मोठे स्वप्न बघितलेल्या तरणाताठा एकुलता एक मुलगा डोळ्यादेखत शहीद झाल्यावरही त्यांच्या कुटुंबातील त्याचे वडील आणखी एक मुलगा असता तर देशासाठी दिला असता अशा भावना व्यक्त करतात तेव्हा अशा कुटुंबाची देशासाठी असलेली निष्ठा व त्याग दिसून येतो .तरुण मुलगा डोळ्यांसमोर अचानक शहीद झाल्याचं वृत्त धडकते तेव्हा कितीही झालं तरी पोटचा गोळा दुरावल्यावर त्याला जन्म देणाऱ्या त्याच्या मातेच्या डोळ्यात अश्रूंच्या धारा वाहत राहणार पण तरीदेखील शहीद झालेला तो पुत्र आपल्या मातेला धीर देताना काय म्हणत असेल असा हृदयस्पर्शी प्रसंग आपल्या रांगोळीच्या कलाकारीचा अदाकारीतून रत्नागिरी येथील प्रसिद्ध रांगोळीकार राहुल कळंबटे यांनी एवढे हुबेहूब रेखाटले आहे की आपणा समोरही प्रत्यक्ष प्रसंग उभा राहतो अशा कलावंताला ही सलाम!
www.konkantoday.com